- हिंदु राष्ट्राच्या सिद्धांतांचा अभ्यास न करताच थयथयाट !
- हिंदु राष्ट्र ही आदर्श समाजकल्याणकारी व्यवस्था आहे. या संकल्पनेचा अभ्यास न करताच त्यावर टीका करणे, हा निवळ हिंदुद्वेष आहे. सध्याची धर्मनिरपेक्ष व्यवस्था हिंदूंना समान न्याय, वागणूक आणि हक्क नाकारते. त्याविषयी चकार शब्द न काढणारे पुरो(अधो)गामी हे ‘रामराज्या’सम असणार्या हिंदु राष्ट्रावर मात्र टीका करतात. हा रावणबुद्धीचाच परिणाम म्हणायचा का ?
पुणे : हिंदु राष्ट्र उभारणीचा सिद्धांत समान हक्क, न्याय्य वागणूक आणि न्याय या मूलभूत तत्त्वांना धूर्तपणे नाकारतो. यासाठी मुसलमानांच्या विरोधात गरळ ओकणे आणि पद्धतशीरपणे सोयीच्या धर्मनिरपेक्षतेचा प्रसार करत रहाणे, हे मार्ग अवलंबले जात आहेत. सोयीच्या धर्मनिरपेक्षतेच्या रणनीतीचा उपयोग करून आणि फसव्या राष्ट्रवादाचा बुरखा पांघरून अशा संघटनाला लोकमान्य करण्याचा प्रयत्न होत आहे. भारतीय संस्कृतीला आणि सर्व भारतियांना ते हिंदू असल्याचे सांगून हिंदुत्वाला वैधता बहाल केली जात आहे. हुकूमशाहीला बळ देणारे राष्ट्रीय ऐक्य आणि देशभक्ती यांचा वापर करत खोट्या राष्ट्रवादाला अन् जातीयतेला खतपाणी घातले जात आहे, असा कांगावा ‘द हिंदु’ या वृत्तपत्राचे माजी संपादक एन्. राम यांनी केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिवसाच्या निमित्ताने २० ऑगस्ट या दिवशी टिळक स्मारक मंदिरात ‘वर्तमान भारतासमोरील ३ आव्हाने’ (जनसमूहाच्या वंचिततेचे वास्तव, धर्मनिरपेक्षतेवरील आक्रमण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने) या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी उपस्थितांना त्यांच्या भाषणाच्या छापील प्रती देण्यात आल्या. त्यामध्ये असा उल्लेख होता. या प्रसंगी अंनिसचे पदाधिकारी, तसेच सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले हेही उपस्थित होते. एन्. राम यांनी कलम ३७० रहित करण्याच्या सरकारच्या निर्णयावर ‘टोकाचा निर्णय’ म्हणून टीका केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात