‘आदर्श उत्सव कसा करावा ?’, हे हिंदु जनजागृती समितीनेच सांगितले ! – सुनील सोनार, माजी अध्यक्ष, श्री बाबा गणपति मंडळ, नंदुरबार
नंदुरबार : गणेशोत्सव आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा ?, हे हिंदु जनजागृती समितीकडून अनेक वर्षांपासून सांगितले जात आहे. त्यांच्या कार्याला आज फळ लागले असून अनेक गणेशोत्सव मंडळांकडून त्याप्रमाणे कृती घडू लागली आहे, असे मनोगत श्री बाबा गणपति मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. सुनील सोनार यांनी व्यक्त केले. येथील तैलिक मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या शिबिरात १६ मंडळांचे पदाधिकारी, मान्यवर, धर्मप्रेमी असे ४५ हून अधिक जण उपस्थित होते.
शंखनाद करून शिबिराचा आरंभ झाला. अधिवक्ता प्रियदर्शन महाजन, श्री. सुनील सोनार, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. या वेळी व्यासपिठावर महाराणा प्रताप युवक मंडळाचे मोहिनीराज राजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे डॉ. सतिश बागुल यांनी ‘गणेशोत्सवाचे वास्तविक स्वरूप आणि जागृती करण्याची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी ‘सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे जागृती करू शकतो ?’ याविषयी उपस्थितांना संबोधित केले. सूत्रसंचालन श्री. ईशान जोशी यांनी केले.
मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कायद्याचे ज्ञान घेणे आवश्यक ! – अधिवक्ता प्रियदर्शन महाजन
हिंदुत्वविषयक कार्य करणार्या आणि गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून विविध सण-उत्सव साजरे करणार्या बहुतांश कार्यकर्त्यांना कायद्याचे ज्ञान नसते. परिणामी अनेक गोष्टींचा प्रतिवाद करण्यास त्यांना अडचणी येतात. तसे होऊ नये, यासाठी मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कायद्याचे ज्ञान घेणे आवश्यक आहे.
मंडळात आरतीनंतर प्रतिदिन हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा करा ! – विश्व हिंदु परिषदेचे तथा सच्चिदानंद व्यायाम शाळेचे अजय कासार
मंडळात हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा एखाद्या दिवशी घेण्यापेक्षा प्रत्येक भाविकाच्या मनात हिंदु राष्ट्राची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी प्रतिदिन आरतीनंतर प्रतिज्ञा करा.
गणेशोत्सव मंडळांनी स्वधर्मियांकडूनच साहित्य घ्यावे ! – जितेंद्र राजपूत, राणा राजपूत सेवा समिती सचिव तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष (वाहतूक सेल)
गणेशोत्सव मंडळांनी देखावे, मंडप, विद्युत रोषणाई, फुले, फळे हे सर्व साहित्य स्वधर्मीयांकडून घ्यावे, जेणेकरून उत्सवाचे पावित्र्य राखले जाईल.