कारखाने, तसेच अन्य प्रदूषण यांकडे दुर्लक्ष करून महापालिकेने मूर्तीदान संकल्पना राबवू नये ! – संभाजीराव भोकरे, शिवसेना, उपजिल्हाप्रमुख
कोल्हापूर : विविध कारखान्यांची मळी, तसेच शहरातील सांडपाणी वर्षभर नदीत मिसळते. या माध्यमातून नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या प्रदूषणावर प्रशासनाकडून कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे कारखाने, तसेच अन्य प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून महापालिकेने श्री गणेशमूर्तीदान संकल्पना राबवू नये, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महापालिकेने कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्तीदान या धर्मबाह्म संकल्पना राबवू नयेत, या मागणीसाठी आयुक्तांच्या नावे असलेले निवेदन शाखा अभियंता अरुणकुमार गवळी यांना देण्यात आले. त्या वेळी ही मागणी त्यांनी केली. या वेळी शासनाने कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देणे थांबवावे, अशा मागणीचे निवेदनही देण्यात आले.
या वेळी अंबाबाई भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गणेशचतुर्थीच्या काळात केली जाणारी पूजा आणि त्यानंतर मूर्तीचे होणारे विसर्जन यांमागे त्याचा लाभ सर्वांना मिळावा हाच आहे. श्री गणेशमूर्ती विसर्जन ही अध्यात्मशास्त्रीय कृती आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्ती विसर्जनसारख्या धार्मिक गोष्टीत प्रशासनाचा हस्तक्षेप नको.’’ या प्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे शहरप्रमुख श्री. अशोक रामचंदानी, हिंदुत्वनिष्ठ जयदीप शेळके, श्री. कृष्णात बाबर, श्री. जगदाळे, शिवसेना विभागप्रमुख श्री. लक्ष्मण लाड, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि सौ. राजश्री तिवारी, तसेच अन्य उपस्थित होते.