Menu Close

हिंदुत्व आणि राष्ट्र विरोधी विचार पसरवून मने भ्रमित करणे, हा पुरोगाम्यांचा आतंकवाद : ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

bhau-torasekar
श्री. भाऊ तोरसेकर

पिंपरी : आतंकवाद म्हणजे केवळ तलवारी आणि बंदुका घेऊन मारणे नव्हे, तर समोरच्याच्या मनात भीतीचे बीजारोपण करणे, तसेच त्याच्या मनातील लढण्याची इच्छाच नष्ट करणे यातून आतंकवादाचा खरा प्रारंभ होतो.

सातत्याने हिंदुत्वविरोधी, राष्ट्रविरोधी विचार पसरवून मने भ्रमित करणे, श्रद्धा खिळखिळ्या करणे, हा पुरोगाम्यांचा आतंकवाद आहे. अशा दहशतीला दहशतीनेच उत्तर देता येते, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक-राजकीय विश्‍लेषक श्री. भाऊ तोरसेकर यांनी केले.

२७ मार्च या दिवशी संत तुकाराम व्यापारी संकुल आणि शिववंदना राष्ट्रीय स्फुरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरोगामी दहशतवाद या विषयावर ते बोलत होते. येथील आचार्य अत्रे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

ते पुढे म्हणाले…

१. हिंदु असल्याविषयी अभिमान बाळगण्याची लाज जे लोक तुमच्यामध्ये निर्माण करत आहेत, त्यांना टक्कर द्या. कोणाचे ऐकायचे आणि कोणाचे नाही, हे तुम्ही ठरवा. सत्य बोलण्याची हिंमत दाखवली की, सत्य आपोआप स्वीकारले जाते. त्यामुळे हिंदूंनो, तुम्हीही होय मी हिंदू आहे ! असे ठामपणे म्हणायला प्रारंभ केल्यास तुमची दहशत चालू होते.

२. समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या एका कार्यक्रमांत भारतमाता की जय असे म्हणण्यास कोणी आग्रह करणार असेल, तर ती घोषणा मी देणार नाही, असे वक्तव्य केले. भारतमाता की जय हे केवळ शब्द नाहीत. ही घोषणा देत कित्येकांनी स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलल्या आहेत. त्या शब्दांमध्ये राष्ट्रवादाची भावना आहे आणि म्हणून ती घोषणा देतांना प्रत्येक भारतियाला स्फुरण चढते; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वा अन्य हिंदुत्ववादी संघटना यांनी काहीही केले की, त्याला विरोधच करायचा, यापलीकडे पुरोगाम्यांकडे अन्य कार्यक्रम राहिलेला नाही, हेच भाई वैद्य यांनी त्यांच्या या वक्तव्यातून दाखवून दिले. आपण काय बोलत आहोत, करत आहोत, याचा अर्थ काय होतो, हे या वयात ज्यांना कळत नाही, त्यांना आम्ही जाणते कसे म्हणणार ?

३. मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापनेपासूनची पहिली मागणी समान नागरी कायदा ही होती. भाई वैद्य आणि अन्य सर्व समाजवादी मंडळींनी याच मागणीसाठी एकेकाळी आटापिटा केला; परंतु हीच मागणी जेव्हा हिंदुत्ववादी संघटना, पक्ष यांनी केली, तेव्हा ती प्रतिगामी झाली आणि याच समाजवाद्यांनी समान नागरी कायद्याला विरोध चालू केला. समान नागरी कायद्याची मागणी हे समाजवादी करत होते, तोपर्यंत समान नागरी कायदा हे पुण्य होते आणि समाजवादी स्वतःला पुरोगामी म्हणवत होते. जेव्हा हीच मागणी भाजप करू लागला, तेव्हा समान नागरी कायदा करणे, हे जणू पाप असून भाजपही प्रतिगामी ठरला. हे तथाकथित पुरोगामी आज जे काही करत आहेत, तो केवळ त्यांचा ढोंगीपणा आहे.

४. हिंदुत्व म्हणजे प्रतिगामी आणि हिंदुत्वाला विरोध म्हणजे पुरोगामी असे पद्धतशीरपणे पसरवले जात आहे. आजचे तथाकथित पुरोगामी हे केवळ विशिष्ट शत्रूकेंद्रित आहेत. संघ, हिंदुत्ववादी संघटना यांच्याविषयी त्यांच्या मनात द्वेष आहे. शत्रूचा शत्रू तो मित्र यांनुसार हिंदुत्वाचे पुरोगामी विरोधक हिंदू संघटनांना शत्रू मानणार्‍या मुसलमान संघटनांच्या नादी लागले आहेत.

५. कन्हैय्याच्या नावाखाली आज जे काही चालू आहे, ते केवळ मार्केटिंग आहे. अण्णा हजारे, केजरीवाल, हार्दिक पटेल आणि आता कन्हैय्या ! ठराविक कालावाधीने या गोष्टी पद्धतशीरपणे घडवल्या जात आहेत, हे आम्हाला लक्षात येत नाही.

६. मुसलमान धर्माच्या नावावर मरायला उतावीळ असतात. अल्लाचे राज्य पृथ्वीवर आणणे, हे त्यांच्यासाठी प्रथम धर्मकर्तव्य असते. त्यामुळे त्यांना कट्टर असावेच लागते. जो मुसलमान कट्टर नसतो, तो मुसलमानच नसतो आणि अशा मुसलमानांनाही मारण्याची आज्ञा कुराणात आहे. कुराण, बायबल या ग्रंथांमध्ये अध्यात्माच्या चार ओळीही मिळणार नाहीत. तुम्हाला पानोपानी तुम्ही अमुक नाही केले, तर तुम्हाला तमुक शिक्षा होईल, असा मजकूर आढळेल. हे ग्रंथ मुळातून न वाचता इतरांनी त्यांवर केलेले भाष्य आम्ही वाचतो आणि स्वतःला भ्रमित करून घेतो. ही वास्तविकता समजून घ्यायला हवी.

७. खरे तर हिंदु असणे, हे प्रगतच आहे; कारण काळानुसार स्वतःमध्ये पालट केलेला एकमेव धर्म म्हणजे हिंदु धर्म आहे. मुसलमानांना काळानुसार स्वतःमध्ये पालट करणे आजतागायत शक्य झाले नाही. काळानुसार स्वतःमध्ये पालट करण्याची सिद्धता असणे म्हणजे पुरोगामित्व आणि हे पुरोगामित्व हिंदु धर्म वेळोवेळी दाखवत आला आहे.

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनवाल्याला पकडा, अशी ओरड करणे, हा आतंकवादाचाच प्रकार ! – भाऊ तोरसेकर

नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली. आजही पोलीस खर्‍या गुन्हेगाराला शोधू शकले नाहीत आणि ते कधी होणारही नाही; कारण या प्रकरणाचा तपास पहिल्याच दिवसापासून भरकटवण्यात आला. कोणताही गुन्हा जेव्हा घडतो, तेव्हा त्यामागे विशिष्ट हेतू असावा लागतो. दाभोलकरांची हत्या करून खरा फायदा कोणाला आणि कसा होऊ शकतो, याचाच शोध घेतला गेला नाही. खर्‍या मारेकर्‍याला पकडा, याऐवजी सनातनवाल्याला पकडा हीच ओरड करण्यात आली. हासुद्धा आतंकवादाचाच प्रकार आहे. पोलीस स्वतःच्या बुद्धीनुसार तपासच करू शकले नाहीत. त्यामुळे आजही खरा गुन्हेगार सापडलेला नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *