Menu Close

नवी देहली येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित राज्यस्तरीय हिंदु अधिवेशन संपन्न

भविष्यात ठिकठिकाणी अधिवेशनांद्वारे संघटन करण्याचा निर्धार

नवी देहली : विदेशी संस्कृतीला भारतात प्रस्थापित करण्यासाठी आतापर्यंत प्रसारमाध्यमांकडून पद्धतशीरपणे भारतीय संस्कृतीला मागास ठरवण्यात आले आणि येत आहे. विज्ञापनांच्या माध्यमातून आपल्यावर विदेशी उत्पादनांचा इतका संस्कार केला गेला की, आज आपल्याला स्वदेशी पेस्ट घ्यायची असेल, तरी बाजारात कोलगेट द्या, अशीच मागणी केली जाते. हे अत्यंत धोकादायक आहे. तेव्हा वाहिन्यांवरील मालिका आणि विज्ञापने यांतून भारतीय संस्कृतीवर होणार्‍या आक्रमणाविषयी सतर्क होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राजीव दिक्षित स्वदेशी रक्षक मंच, वल्लभगढ, फरिदाबादचे श्री. बालकिशन ठाकूर यांनी केले. नवी देहली येथील श्रीनिवासपुरी भागातील भारत सेवाश्रम संघाच्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनात ते बोलत होते. १९ आणि २० डिसेंबर असे २ दिवस चाललेल्या या अधिवेशनात नवी देहली, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील हिंदु संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ता, विचारक, असे ५० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.
श्री. ठाकूर पुढे म्हणाले, आज विविध मालिकांच्या अगदी नावांपासून त्यातील सादरीकरणापर्यंत प्रत्येक गोष्टीतून हिंदु संस्कृती आणि सभ्यता यांवर प्रहार केला जात आहे. सास, बहु और साजिश, ही मालिका त्याचाच एक भाग आहे. निसर्गाला अनुकूल नसलेली उत्पादने विज्ञापनांच्या माध्यमातून आपल्या माथी मारली जात आहेत, याविषयी आपण सतर्क झाले पाहिजे.

संत हिंदु धर्माचा प्रसार करत असल्यानेच प्रसारमाध्यमांद्वारे त्यांची अपकीर्ती ! – नीलम दुबे, प्रवक्त्या, संत श्री आसारामजी बापू आश्रम

आज विदेशी आस्थापने त्यांच्या अर्थप्राप्तीसाठी वाहिन्यांच्या माध्यमातून पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रसार करून हिंदूंना धर्मापासून दूर नेत आहेत. त्यांचा हा डाव हिंदु साधूसंतांनी ओळखून त्याविरोधात त्यांच्या भक्तांना जागृत केल्यानेच आज त्यांची मिडिया ट्रायल होत आहे. कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य, स्वामी नित्यानंद आणि प.पू. आसाराम बापू यांची मिडीया ट्रायल होण्याचे हेच कारण आहे. एकीकडे विदेशी आस्थापने आणि हिंदुविरोधक यांच्याकडून या वाहिन्यांना बक्कळ पैसा मिळतो. हिंदु समाजाने हे लक्षात घेऊन वाहिन्या काय दाखवतात, यापेक्षा संबंधित संतांचे कार्य काय आहे ? याकडे लक्ष द्यायला हवे. अनेक पुरो(अधो)गामी महिला स्त्रियांच्या हक्कांसाठी भांडत असल्याचा आव आणतात; पण साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयी त्या ब्रही काढत नाहीत. यातून त्यांचा ढोंगीपणा सिद्ध होतो.

पुरो(अधो)गाम्यांचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी हिंदु संघटनांनी एकमेकांना साहाय्य करणे आवश्यक ! – श्री. गजानन केसकर, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, राजस्थान

पुरो(अधो)गामी विचारवंत हिंदु धर्माविषयी जी आक्षेपार्ह विधाने करतात, त्याची दखल कोणी घेत नाही; मात्र त्यांच्या हत्या झाल्यावर हिंदु संघटनांच्या नावाने खापर फोडले जाते. खर्‍या मारेकर्‍यांना शोधण्यापेक्षा या घटनेचे भांडवल करून पुरोगामी हिंदु संघटनांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सनातन आज या पुरोगामी षड्यंत्राच्या जात्यात आहे; मात्र अन्य संघटना सुपात आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. आपण संघटितपणे या षड्यंत्राच्या विरोधात आवाज उठवला, तरच हिंदुत्वाची गळचेपी थांबेल.

हिंदूंचे संघटन हेच, त्यांच्या सर्व समस्यांचे समाधान ! – श्री. विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

देश आणि धर्माची स्थिती पालटण्यासाठी क्रांती व्हायला हवी, असे अनेकांना वाटते; पण ईश्‍वर जेव्हा जेव्हा कार्य करतो, तर ते उत्क्रांतीच्या स्वरूपात असते. क्रांतीमध्ये विध्वंस असतो, तर उत्क्रांतीमध्ये सर्वांचा विचार असतो. साधू-संतांच्या भाकितानुसार २०२३ मध्ये हिंदुु राष्ट्र येणारच आहे; पण तत्पूर्वी आपली साधना म्हणून आपल्याला हिंदु धर्मावर होत असलेल्या वैचारिक आघातांचा प्रतिकार करायला हवा आणि हिंदूंना संघटित करायला हवे. प्रभावी संघटन, हेच सर्व समस्यांचे समाधान आहे.

गोरक्षण आणि गोसंवर्धनाचा प्रारंभ घरापासून करा ! – श्री. रूपेश यादव, गोमानव सेवा न्यास

गायीचे दूध आणि गायीच्या पंचगव्यापासून बनलेल्या वस्तू आपण वापरायला हव्यात. अशा वस्तूंची जेवढी मागणी वाढेल, तेवढे गायींना संरक्षण मिळेेल. तसेच गायीची हत्या करून तिच्या चामड्यापासून बनवलेले सोफे, खुर्च्या, पर्स, बेल्ट, चपला, जॅकेट वापरणे आपण कटाक्षाने टाळायला हवे. स्वतः सतर्क राहून अशा गोष्टी टाळणे आणि इतरांनाही प्रवृत्त करणे, ही उत्तम गोसेवा आहे.

क्षणचित्रे 

१. अधिवेशनस्थळी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आणि विक्री केंद्र उभारण्यात आले होते.
२. कार्यस्थळी हिंदु राष्ट्र, गोरक्षा आणि गंगारक्षा याविषयी लावलेल्या प्रदर्शनाचाही उपस्थितांनी लाभ घेतला.
३. येथील सनातनच्या ६१ टक्के पातळीच्या साधिका श्रीमती पारूल भट्टाचारजी (वय ८३ वर्षे) यांना चालतांना सावकाश चालावे लागते. अशा स्थितीतही त्या अधिवेशनाला आल्या होत्या.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनामुळे माझ्यात झालेल्या पालटामुळे माझे कुटुंबीय आणि शेजारचे प्रभावित ! – श्री. महेंद्र शर्मा, वैदिक उपासना पीठ

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश मुंजाल यांच्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन कसे करावे ? आणि त्याचे होत असलेले लाभ यांविषयी उपस्थितांना सांगितले. या वेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून राष्ट्रीय हिंदू आंदोलन कशा प्रकारे होते, याचे चलचित्रही दाखवण्यात आले. या वेळी वैदिक उपासना पीठाचे श्री. महेंद्र शर्मा यांनीही आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांच्या व्यक्तीमत्त्वात कशाप्रकारे पालट झाला, याची माहिती उपस्थितांना दिली. ते म्हणाले, आंदोलनासाठी वेळेत जाणे, सर्वांसमोर बोलण्याची सिद्धता होणे, पावसाची पर्वा न करताही आंदोलनाला जाता येणे, अशा प्रकारचे पालट माझ्यात झाले. आंदोलनातून माझ्यात झालेल्या परिवर्तनामुळे घरातील आणि शेजार्‍यांनाही आंदोलनाला येण्याची इच्छा व्यक्त केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *