हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चिपळूण नगराध्यक्षांना निवेदन
चिपळूण : धर्मशास्त्राने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्तीदान या अशास्त्रीय संकल्पनेविषयी हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधन योग्यच आहे, असे प्रतिपादन चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई खेराडे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंच्या गणेशोत्सवाला लक्ष्य करत ‘कृत्रिम तलाव आणि मूर्तीदान’ ही अशास्त्रीय संकल्पना राबवून त्याद्वारे होणारे जलप्रदूषण आणि श्री गणेशमूर्तीची विटंबना तातडीने रोखण्यासाठीचे निवेदन त्यांना देण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या वेळी कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींच्या विक्रीविषयीही चर्चा समितीच्या वतीने करण्यात आली. कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते, याविषयी हरित लवादाने महाराष्ट्र शासनाला दिलेल्या आदेशाविषयी नगराध्यक्षांना अवगत करण्यात आले. कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींची निर्मिती आणि विक्री चिपळूण येथेही मोठ्या प्रमाणात होत असून याविषयी नगरपालिका प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती करण्यात आली. यावर नगराध्यक्षा सौ. खेराडे यांनी कागदी लगद्यांच्या मूर्तींविषयी राज्यशासनानेच ठोस निर्णय घेणे अपेक्षित आहे. तो घेतला गेला, तर त्याची कार्यवाही येथेही करता येईल. तोपर्यंत समितीने त्याविषयीचे प्रबोधनाचे कार्य करत राहिले पाहिजे.
या सर्व विषयांसंबंधी तेथे उपस्थित भाजप नगरसेवक श्री. आशिष खातू आणि शिवसेनचे नगरसेवक श्री. शशीकांत मोदी यांनी या चर्चेत सहभाग घेतला आणि सदर निवेदन नगराध्यक्षा सौ सुरेखाताई खेराडे यांना दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे आणि डॉ. हेमंत चाळके उपस्थित होते.