पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांचे उद्गार
काश्मीरप्रश्नी मध्यस्थाची भूमिका बजावण्याची इच्छा व्यक्त करणारे ट्रम्प यांच्या भूमिकेत पालट !
पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीर प्रश्नावर चर्चा झाली. ‘काश्मीरमधील स्थिती नियंत्रणात आहे’, असे मोदी यांना वाटते. तेथे काहीतरी चांगले करून दाखवण्यासाठी मोदी सक्षम आहेत, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत केले. ट्रम्प आणि मोदी यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्या वेळी बोलतांना ट्रम्प यांनी हे विधान केले. काश्मीरप्रश्नी पाक आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच पाकचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौर्यावर असतांना ट्रम्प यांनी २२ जुलै या दिवशी अमेरिका काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास सिद्ध असल्याचे सांगितले होते. त्यांनी याविषयी २ ऑगस्ट आणि २३ ऑगस्ट या दिवशीही पुनरुच्चार केला होता. त्यामुळे जी-७ परिषदेच्या (जी- ७ म्हणजे अमेरिका, कॅनडा, ईटली, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि जपान या देशांचा समूह) वेळी ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते; मात्र ट्रम्प यांनी याविषयी भूमिका पालटल्यामुळे पाकची पंचाईत झाली आहे.
जी-७ परिषदेला भारताला विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे या परिषदेला मोदी उपस्थित होते. भारताने ३७० कलम रहित केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटले. भारताने वारंवार ‘हे कलम रहित करणे, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. पाकने हे सत्य स्वीकारणे आवश्यक आहे’, अशी कणखर भूमिका घेतल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही विविध देशांतून त्याला समर्थन मिळाले होते. जी-७ परिषदेतही असेच चित्र दिसून आले.
काश्मीर प्रश्न भारत-पाक मिळून सोडवण्यास सक्षम ! – मोदी
पत्रकार परिषदेच्या वेळी मोदी म्हणाले, ‘‘काश्मीर समस्या ही भारत आणि पाक यांच्यातील द्विपक्षीय सूत्र आहे. या समस्येवरून आम्ही जगातील कुठल्याही देशाला कष्ट देऊ इच्छित नाही.’’ त्या वेळी ट्रम्प यांनीही ही दोन्ही देशांमधील समस्या असून दोन्ही देश ती मिळवून सोडवू शकतात, असे सांगितले. मोदी म्हणाले, ‘‘मी पंतप्रधान झाल्यावर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली होती. त्या वेळी मी त्यांना आतंकवादाच्या विरोधात दोघांना मिळून लढायचे आहे, हे सांगितले होते.’’
मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिका हे लोकशाहीच्या मूल्यांवर चालणारे देश आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या सूत्रावर चर्चा झाली. आम्ही अमेरिकेच्या सूचनांचे स्वागत करतो. अमेरिकेतील भारतीय समुदाय तेथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.
मोदी यांची विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी भेट
जी-७ परिषदेच्या काळात मोदी यांनी जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मैक्रो, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि संयुक्त राष्ट्रांचे सचिव अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली.
काश्मीरमधून ३७० कलम रहित केल्यानंतर मोदी यांनी प्रथमच या सर्वांची भेट घेतली. या आधी ब्रिटनचे पंतप्रधान गुटेरेस यांनी भारत आणि पाक यांना संयम पाळण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी शिमला कराराचाही उल्लेख केला होता. या करारानुसार काश्मीर प्रश्न केवळ द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवला जाऊ शकतो, असा उल्लेख आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात