स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्यांना धडा शिकवा ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, युवा मोर्चा, हिंदुस्तान नॅशनल पार्टी
नालासोपारा (जिल्हा पालघर) : ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी स्वत:चे आयुष्य दिले, ज्यांनी हिंदूंसाठी महत्त्वाची भूमिका बजावली, अशा महापुरुषाच्या पुतळ्याला ‘एन्.एस्.यू.आय.’च्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणार्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदुस्तान नॅशनल पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी केले. राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने नालासोपारा (प.) रेल्वेस्थानकाच्या ठिकाणी २५ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. देहली येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचा अवमान करणार्या काँग्रेसप्रणीत ‘एन्.एस्.यू.आय.’च्या कार्यकर्त्यांना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी या वेळी आंदोलकांनी केली.
हिंदू गोवंश रक्षा समिती, योग वेदांत सेवा समिती, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री बजरंग सेवा दल, परशुराम सेना, गोरक्षा समिती, श्री स्वामी समर्थ सेवा परिवार, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटना, संप्रदाय यांसह हिंदुस्तान नॅशनल पार्टी, शिवसेना आणि भाजप या पक्षांचे कार्यकर्ते या आंदोलनात उत्सफूर्तपणे सहभागी झाले होते. या आंदोलनातील विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाला देण्यात आलेल्या निवेदनावर शेकडो नागरिकांनी स्वाक्षर्या केल्या.
‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या निर्णयानुसार कागदी लगद्याच्या मूर्तींच्या विक्रीवर बंदी आणा ! – बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती
पर्यावरणाला घातक असल्याने ‘राष्ट्रीय हरित लवाद, पुणे’ यांनी ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींवर बंदी आणली आहे; मात्र या निर्णयावर योग्य कार्यवाही न केल्यामुळे आज बाजारात मोठ्या प्रमाणावर कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती विक्रीस ठेवलेल्या आढळून येतात. हा विरोधाभास दूर करण्यासाठी पर्यावरणमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून कागदी लगद्यापासून मूर्तीची निर्मिती, वितरण आणि विक्री होणार नाही, अशी सक्त सूचना प्रशासनाला द्यावी.
तसेच शाडूची माती आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी गणेशभक्तांनी या आंदोलनात केली.
‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आतंकवाद पसरवला जातो, हा कांगावा करू नये ! – मनोज जोशी, योग वेदांत सेवा समिती
‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आतंकवाद पसरवला जात आहे, असा कांगावा करणारे ठिकठिकाणी मशिदीवरील भोंग्यांनी प्रतिदिन ५ वेळा ध्वनीप्रदूषण होते त्याविषयी काही बोलतात का ? ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी त्रास होतो हा कांगावा कोणी करू नये. सर्वधर्मसमभाव हिंदूंना शिकवण्याऐवजी सर्वांसाठी समान नागरी कायदे करा. वसई, नालासोपारा आणि विरार परिसरात अनेक मिशनरी शाळा आहेत; मात्र आपली गुरुकुल परंपरा शिकविण्यासाठी हिंदु मुलांसाठी शाळा नाहीत. येथील हिंदूंनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
चर्चचेही सरकारीकरण करण्यात यावे ! – दिप्तेश पाटील, हिंदू गोवंश समिती
देशभरात विविध चर्चमध्ये घोटाळे उघडकीस येत आहेत; मात्र सरकारची दृष्टी हिंदूंच्या पैशांवर आहे. म्हणूनच सरकार हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करते.
आंदोलनप्रसंगी करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हा अपमान कायमचा थांबवण्यासाठी त्यांना ‘भारतरत्न’ घोषित करावे.
२. राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची विटंबना करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याचा नवा कायदा बनवून देशविरोधी शक्तींवर वचक बसवावा.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणार्यांवर कठोर कारवाई करा आणि काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नंदुरबार : काँग्रेसच्या ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ (एन्.एस्.यु.आय.) च्या देशद्रोही कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी, विस्थापित काश्मिरी हिंदूंचे काश्मीर खोर्यात पुनर्वसन करण्यात यावे, अशा मागण्या समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २५ ऑगस्ट या दिवशी येथील नेताजी सुभाषबाबू चौकात आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केल्या. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. दिलीप ढाकणे पाटील यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, व्यायाम शाळा, मंडळाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणार्यांवर कठोर कारवाई करा !
भारतीय वैदिक ब्राह्मण संघटनेचे किशोर पाठक यांची मागणी
यवतमाळ : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भारतीय वैदिक ब्राह्मण संघटनेचे श्री. किशोर पाठक यांनी २५ ऑगस्टला दत्तचौक येथे पार पडलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केली.
या आंदोलनाला पतंजली योगपिठाचे श्री. संजय सांभारे, आठवडी बाजार येथील दुर्गादेवी मंदिराचे श्री. सुरेश यादव तसेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे ३० कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाला २५० जिज्ञासूंनी स्वाक्षरीद्वारे पाठिंबा दिला. साध्या वेशातील गोपनीय शाखेच्या पोलीस कर्मचार्यांनी या आंदोलनाचे चित्रीकरण केले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. आंदोलनाच्या दिवशी पहाटेपासूनच संततधार पाऊस चालू होता. त्यामुळे सनातनच्या साधकांनी वरूणदेवतेला भावपूर्ण प्रार्थना केल्यानंतर आंदोलनाच्या दोन घंटे अगोदर पाऊस अल्प झाला. आंदोलन चालू झाल्यावर पाऊस बंद झाला.
२. भारतीय वैदिक ब्राह्मण संघटनेचे श्री. किशोर पाठक यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.
‘जय श्रीराम’ न म्हटल्याने मारहाण झाली’, असा खोटा कांगावा करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करा !
नागपूर येथील आंदोलनात चेतावणी
नागपूर : देशभरात गेल्या काही दिवसांपासून ‘बळजोरीने जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडले’, ‘जय श्रीराम’ची घोषणा न दिल्याने आम्हाला हिंदूंनी मारहाण केली’, ‘हिंदुत्ववनिष्ठ जमावाने अल्पसंख्याक समाजातील युवकाची हत्या केली’, अशा खोट्या तक्रारी धर्मांध, निधर्मीवादी आणि तथाकथित पुरोगामी यांच्याकडून करून जाणीवपूर्वक देशातील वातावरण तणावपूर्ण अन् सरकारविरोधी बनवले जात आहेत. हिंदु समाजाच्या विरोधात द्वेषाची भावना पसवली जात आहे. महाराष्ट्रातील संभाजीनगर, उत्तरप्रदेश येथील चंदौली आणि उन्नाव येथे स्थानिक पोलिसांनी केलेल्या चौकशीत अशी बनावट प्रकरणे उघडकीस झाली आहेत. या प्रकरणात उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी ‘उत्तरप्रदेशमध्ये जातीय दंगे भडकावण्यासाठी धर्मांधांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा न दिल्याचे कारण पुढे केल्याचे’ सांगितले. एकूणच जाणीवपूर्वक खोटा, विद्वेषी प्रचार करून देशाची एकता-अखंडता धोक्यात आणणारे संबंधित धर्मांध, पुरोगामी, निधर्मीवादी समाजकंटकांच्या विरोधात शासनाने राष्ट्रीय स्तरावर एक विशेष तपास पथक नेमून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे नागपूर जिल्हा सहसमन्वयक श्री. विद्याधर जोशी यांनी केली. ते २२ अॅागस्ट या दिवशी झाशी राणी चौकात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते.
या वेळी अन्यही राष्ट्रविषयक मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनाच्या वेळी देण्यात आलेले निवेदन प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्री. अविनाश कातडे यांनी स्वीकारले.