मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) : सध्याच्या प्रतिकूल काळात शाहिरांनी शाहिरीच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन केले, हे कौतुकास्पद आहे. आज आपण ज्या श्रीकृष्णाची गोकुळाष्टमी साजरी करत आहोत, त्या श्रीकृष्णाने धर्म संस्थापनाचे मोठे कार्य केले आहे. देश सध्या काश्मिरी हिंदूंची समस्या आणि धर्मांतर यांनी ग्रस्त आहे. त्यामुळे आपणही या समस्यांसाठी शाहिरीच्या माध्यमातून हिंदूंना जागृत करण्याचा प्रयत्न करावा. लवकरच गणेशोत्सव येत असून त्या काळात शास्त्रानुसार वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी हिंदूंचे प्रबोधन करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी येलूर येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात केले.
शाहूवाडी तालुक्यातील ‘ओम स्वरूप शिवशक्ती आध्यात्मिक भेदिक शाहीर मंडळा’च्या वतीने गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणजेच २३ ऑगस्टला भव्य भेदिक शाहिरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मार्गदर्शन करतांना श्री. दुसे बोलत होते. याच्या आयोजनात अध्यक्ष शाहीर श्री. दगडू पाटील आणि उपाध्यक्ष शाहीर श्री. गणपति कातकर यांचा प्रमुख सहभाग होता. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर येथील श्री. बबन दास चौरे, तसेच श्री. सखाराम खोत उपस्थित होते. या वेळी विविध भागांतून आलेले १२५ हून अधिक शाहीर आणि नागरिक उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमस्थळी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा’, याविषयी हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले.
२. अशा प्रकारच्या राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या बैठका तुमच्या गावातही आयोजित करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. दुसे यांनी केल्यावर त्याला उपस्थितांनी अनुमोदन दिले.
३. या कार्यक्रमासाठी गेली ४ वर्षे सातत्याने हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात येत आहे. (धर्मजागृतीच्या कार्यात एक सहभाग म्हणून गेली ४ वर्षे हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करणार्या ‘ओम स्वरूप शिवशक्ती आध्यात्मिक भेदिक शाहीर मंडळा’चे अभिनंदन ! प्रत्येकाने हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून यथाशक्ती राष्ट्र आणि धर्म जागृती यांच्या कार्यात सहभागी व्हावे ! – संपादक)
येणार्या गणेशोत्सव काळात शाहिरांनी त्यांच्या भागात एकही श्री गणेशमूर्ती दान होणार नाही, यासाठी संकल्प करूया, असे आवाहन केल्यावर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.