स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
पुणे : सावरकरद्वेष अंगी भिनलेल्या काँग्रेसप्रणीत ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २१ ऑगस्टला देहली विद्यापिठात बसवण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासून पुतळ्याची विटंबना केली. हे निंदनीय कृत्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा करावी, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान कायमचा थांबवण्यासाठी त्यांनी ‘भारतरत्न’ जाहीर करावे, अशा मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नायब तहसीलदार हेमंत निकम यांना देण्यात आले. या प्रसंगी गार्गी सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. विजय गावडे, श्री. योगीराज मांडले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. ‘अंदमान येथून काँग्रेसच्या काळात पुसून टाकण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यपंक्ती केंद्र सरकारने पुन्हा लावाव्यात, तसेच मार्सेलिस (फ्रान्स) येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भव्य स्मारक बनवावे’, अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.