मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’
सागर : वडिलांच्या आज्ञेसाठी राजसिंहासन सोडणारा रामासारखा आदर्श पुत्र, पतीसाठी वनवास स्वीकारणारी सीतेसारखी आदर्श पत्नी, राज्याचा त्याग करणारा लक्ष्मण आणि पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालवणारा भरत यांच्यासारखे आदर्श बंधू, हे रामराज्याचे उदाहरण आहे. आज असे रामराज्य आहे का ? अशा रामराज्याच्या अर्थात् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्याला स्वतःपासून आणि परिवारापासून प्रारंभ करावा लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते येथील बडाबाजारातील महाराजा हरडोलजी मंदिरात आयोजित बैठकीत बोलत होते. ‘हिंदु युवा वाहिनी भारत’चे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता विकास सेन आणि श्री. अभिमन्युसिंह बुंदेला यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ४० हून अधिक युवक उपस्थित होते .
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘पाश्चात्त्य संस्कृतीच्या आचरणातील फोलपणा आणि धर्माचरणाचे महत्त्व’ याविषयी उपस्थितांना माहिती दिली. या वेळी रामनाम जप करून रामराज्याच्या स्थापनेसाठी ‘रामनाम संकीर्तन अभियान’ही राबवण्यात आले.
खुरई (जिल्हा सागर) येथे बैठक
खुरई : येथील श्री सिद्धीविनायक मंदिरात धर्मप्रेमी श्री. शुभमकांत तिवारी यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. येथील हिंदु एकता संघटनेच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘धर्मशिक्षण‘ आणि ‘हिंदु राष्ट्र’ यांविषयी माहिती दिली.
गंज बासुदा येथे व्यापार्यांच्या बैठकीत साधनेविषयी मार्गदर्शन
विदीशा : गंज बासुदा येथील व्यापार्यांच्या बैठकीतही हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विनोद शहा यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन झाले.
सागर येथे दौर्यावर असतांना ‘जय महाकाल युवा संघटने’च्या प्रमुख कार्यकर्त्यांनीही हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची भेट घेऊन त्यांना संघटनेच्या कार्याविषय अवगत केले. या वेळी श्री. शिवम चौरसिया, श्री. सपन ताम्रकार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.