Menu Close

धर्मविरोधी पर्याय वापरूनही आजतागायत नदीचे प्रदूषण थांबले आहे का ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्‍न

  • पुणे येथील पत्रकार परिषद

  • गणेशभक्तांनो, धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करा !

डावीकडून सर्वश्री विजय गावडे, विकास भिसे, अधिवक्ता मोहनराव डोंगरे, पराग गोखले, अधिवक्ता अनिल विसाळ, अधिवक्ता नीलेश निढाळकर, मयुरेश अरगडे

पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुणे महानगरपालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदात विसर्जन करा, मूर्तीदान करा आणि कागदी लगद्याच्या मूर्ती वापरा, असे आवाहन आणि आता मूर्ती (विसर्जनासाठी नव्हे) विघटनासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर यांसारख्या अशास्त्रीय पद्धती अवलंबून अघोरी आणि स्वयंघोषित धर्मोपदेशकाप्रमाणे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे; मात्र यातून मूळ प्रश्‍नाला सोयीस्करपणे बगल दिली जात आहे. या सर्व गोष्टी केल्याने नदीचे प्रदूषण थांबले आहे का?, पर्यावरणाचे रक्षण झाले आहे का?, ३६५ दिवस नदीपात्रात राडारोडा टाकणे, तसेच प्रक्रिया न करता नदीपात्रात सांडपाणी सोडणे थांबले आहे का?, गेली काही वर्षे ९० सहस्र क्युसेक्स पाणी सोडूनही पुण्यात कधी पूर येत नव्हता, आता केवळ ४५ सहस्र क्युसेक्स पाणी धरणातून सोडले, तरी पुण्यात नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली, ही स्थिती श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे झाली आहे का ? या प्रश्‍नांची उत्तरे पालिका प्रशासनाने आणि तथाकथित पुरोगामी अन् नास्तिकतावादी यांनी आधी द्यावीत अन् नंतर श्री गणेशमूर्तींच्या वहात्या पाण्यातील विसर्जनाविषयी भूमिका मांडावी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.

पालिका आणि नास्तिकतावादी यांच्या फसव्या अन् अशास्त्रीय मोहिमांना पुणेकर नागरिकांनी बळी पडू नये. कृत्रिम हौदात विसर्जन आणि अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून मूर्तीविघटन न करता धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, तसेच अतीप्रदूषणकारी कागदी लगद्याची मूर्ती न घेता शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांतील मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहनही श्री. गोखले यांनी या वेळी पत्रकार परिषदेत केले.

या पत्रकार परिषदेला पर्यावरण अभ्यासक श्री. विकास भिसे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री. मयुरेश अरगडे, गार्गी सेवा फाऊंडेशनचे श्री. विजय गावडे, अधिवक्ता मोहनराव डोंगरे, अधिवक्ता नीलेश निढाळकर, अधिवक्ता अनिल विसाळ आणि सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव हेही उपस्थित होते.

पत्रकार परिषदेतील मान्यवरांचे विचार अमोनियम बायकार्बोनेटच्या आग्रहामागचा अर्थ काय ? – विकास भिसे, पर्यावरणाचे अभ्यासक

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते; मात्र त्याला हरताळ फासत महापालिका प्रशासनच गणेशोत्सवासाठी शेकडो टन अमोनियम बायकार्बोनेट हे रसायन फुकट वाटत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवू नयेत, यावर एकमत असतांना त्या लवकर विरघळण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट वापरायला सांगणे, हा मोठा विरोधाभासच आहे. अमोनियम बायकार्बोनेटचा पाण्याशी संपर्क आला की, अमोनिया हा वायू निर्माण होतो. तो घसा, श्‍वसननलिका, त्वचा, तसेच डोळे यांना हानीकारक आहे. या रसायनाची प्लास्टर ऑफ पॅरिससह रासायनिक प्रक्रिया झाल्यावर कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना आणि अमोनियम सल्फेट हे पदार्थ सिद्ध होतात. त्यांपैकी अमोनियम सल्फेट हे खत म्हणून वापरू शकतो, असे सांगितले जाते; पण ते अ‍ॅसिडिक आहे आणि तीव्र मात्रेत असल्याने बागेतील झाडांना ते हानीकारक ठरू शकते. एकीकडे केंद्रस्तरावर सेंद्रीय खतांचा वापर करावा, असे सांगितले जाते, तर दुसरीकडे महापालिका स्तरावर रासायनिक खतांच्या वापराचे आवाहन केले जात आहे. हे अनाकलनीय आहे. धरणातून पाणी सोडणे, हा विनाखर्चिक उपाय उपलब्ध असतांनाही प्रतिवर्षी कृत्रिम हौद, अमोनियम बायकार्बोनेट यांवर लक्षावधी रुपयांची उधळपट्टी होत आहे; म्हणून विसर्जनासाठी या पर्यायांचा आग्रहामागे काय अर्थ आहे?, याचा शोध घ्यायला हवा.

परंपरांमध्ये आडकाठी आणू नका ! – मयुरेश अरगडे

पालिकेला खरंच पर्यावरण रक्षणाची चाड असेल, तर पालिकेने शाडू मातीच्या मूर्ती बनवणार्‍या मूर्तीकारांना अनुदान द्यावे.  नैसर्गिक रंगांच्या वापराचा आग्रह अन् रासायनिक रंगांच्या वापरावर बंदी आणावी, मूर्तीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावर बंदी आणावी; पण असे न करता धर्मविरोधी आणि पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍या उपाययोजना करून पालिका प्रशासनाला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्‍न अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री. मयुरेश अरगडे यांनी या वेळी उपस्थित केला. हिंदूंच्या परंपरांमध्ये आडकाठी आणू नका.

विसर्जनाच्या दिवसांत मुबलक पाणी सोडावे ! – अधिवक्ता मोहनराव डोंगरे

जलप्रदूषण रोखण्याच्या नावाखाली कृत्रिम हौद आणि अमोनियम बायकार्बोनेट यांमध्ये गणेशमूर्ती विर्सजित करण्याचे आवाहन केले जाते; पण कृत्रिम हौदातील मूर्ती आणि पाणी पुन्हा नदीतच सोडले जाते, हे काही वर्षांपूर्वी उघड झाले आहे. त्यामुळे कृत्रिम हौदाचा ढोंगीपणा बंद करून नदीपात्रात विसर्जनाच्या दिवसांत मुबलक पाणी सोडावे, असे आवाहन अधिवक्ता मोहन डोंगरे यांनी पालिका प्रशासनाला केले. भारतीय संविधानाने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, तो हिंदूंपासून हिरावून घेऊ नये.

हिंदूंच्याच सणांवर गदा का? – अधिवक्ता अनिल विसाळ

प्रदूषणाच्या नावाखाली प्रत्येक वेळी केवळ हिंदूंच्या सणांवर गदा आणली जाते. जेव्हा वर्षभर प्रदूषण होतांना कोणी आवाज उठवत नाही. अनधिकृत भोंगे हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही कार्यवाही होत नाही; मात्र गणेशोत्सव आल्यावर जलप्रदूषणाचा कांगावा केला जातो.

या वेळी सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव यांनी गणेशोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व विषद केले, तसेच उत्सवात शिरलेल्या अपप्रकारांच्या विरोधात जागृती आणि प्रबोधन करणे, आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. श्री. मयुरेश अरगडे, अधिवक्ता मोहनराव डोंगरे, अधिवक्ता नीलेश निढाळकर, श्री. विजय गावडे यांनीही समितीच्या मोहिमेला पाठिंबा व्यक्त केला.

धर्मश्रद्धांवरील आघात खपवून घेतला जाणार नाही ! – पराग गोखले

नवसाला पावणारा किंवा इच्छापूर्ती गणपती असे दावे करणार्‍या गणेश मंडळांवर कार्यवाही व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. जादूटोणा विरोधी कायद्याच्या आडून हिंदु धर्मावर घाला घातला जाणार, अशी भिती व्यक्त केली जात होती. त्याचाच पुरावा आज आपल्याला पहायला मिळत आहे. अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्‍यांना आमचा विरोधच आहे; परंतु अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंचे धर्माचरण, सण आणि श्रद्धा यांवर होणारा आघात कदापि खपवून घेतला जाणार नाही.

कागदी लगद्याची मूर्ती प्रदूषण करते, हा राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय !

हिंदु जनजागृती समितीने कागदी लगद्याची मूर्ती ही अतीप्रदूषणकारी असल्याने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका प्रविष्ट केली होती. त्यात दिलेली तथ्ये राष्ट्रीय हरित लवादाने मान्य करत मूर्तींचा वापर करण्याच्या शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे. यासंदर्भात मुंबईतील प्रसिद्ध शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्थेने संशोधन केले. संशोधनाअंती १० किलो कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते, तसेच त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅड्मियम, टायटॅनिअम ऑक्साईड असे विषारी धातू आढळले असे गंभीर निष्कर्ष सांगितले. सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन या संस्थेने साधा कागद डिस्टिल्ड वॉटरमध्ये टाकून संशोधन केले असता, कागद विरघळवलेल्या या पाण्यात ऑक्सिजनची मात्रा शून्यावर आल्याचा अत्यंत घातक परिणाम त्यांच्या प्रयोगात स्पष्ट झाला, असे श्री. पराग गोखले यांनी या वेळी सांगितले.

श्री. गोखले पुढे म्हणाले की, प्रशासनाने खरेतर धार्मिक विधींमध्ये कोणताही हस्तक्षेप करण्यापूर्वी त्या क्षेत्रामधील अधिकारी धर्माचार्यांचे मार्गदर्शन घ्यायला हवे; मात्र ती अपेक्षा धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत करणे व्यर्थच आहे; पण किमान विवेकी दृष्टीने जरी हा विषय हाताळला, तरी ही समस्या सुटेल. यासंदर्भात हिंदु जनजागृती समिती समविचारी संस्थांसह गेली अनेक वर्षे प्रबोधन करत आहे. श्री गणेशाने शासन, प्रशासन आणि राज्यकर्ते यांना सुबुद्धी द्यावी, हीच त्याच्या चरणी प्रार्थना !

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *