आंतरराष्ट्रीय ज्योतिष महासंघाचे अध्यक्ष लोकराज पौडेल, नेपाल ज्योतिष परिषदेचे पदाधिकारी लक्ष्मण पंथी आणि संतोष वशिष्ठ यांची भेट
काठमांडू : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी आंतरराष्ट्रीय ज्योतिष महासंघाचे अध्यक्ष लोकराज पौडेल, नेपाल ज्योतिष परिषदेचे पदाधिकारी श्री. लक्ष्मण पंथी आणि श्री. संतोष वशिष्ठ यांची २३ ऑगस्ट या दिवशी भेट घेतली. या वेळी आंतरराष्ट्रीय ज्योतिष महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे ज्योतिष संमेलन आयोजित करण्याविषयी चर्चा झाली.
मानव धर्म सेवा समितीचे सागर कटुवाल यांची भेट
सद्गुुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील मानव धर्म सेवा समितीचे श्री. सागर कटुवाल यांची २३ ऑगस्ट या दिवशी भेट घेतली. या वेळी श्री. कटुवाल म्हणाले, नेपाळमध्ये भारतविरोधी भावना निर्माण करून निवडणुका जिंकल्या जात आहेत; पण आता येथील जनतेला सत्य लक्षात येत आहे. लोकशाहीविषयी बोलतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ग्रामपंचायत स्तरापासून निवडणूक लढवून पुढे विधानसभा आणि नंतर लोकसभा यांचे प्रतिनिधित्व करत गेल्यास लोकप्रतिनिधींना खरा अनुभव येईल. सध्या परिवारवादाच्या नावावर कोणीही आमदार आणि खासदार यांच्या निवडणुका लढतात अन् जिंकतात. अशांना कोणताही अनुभव नसतो. आपल्या देशात एखाद्या सरकारी कार्यालयात शिपाई बनण्यासाठीही शैक्षणिक आणि बौद्धिक पात्रता लागते; परंतु एखादा अशिक्षित व्यक्तीही आमदार, खासदार किंवा मंत्री बनतो. त्याला वयाची कोणतीही मर्यादा नसते. लोकशाही यशस्वी होण्यासाठी लोकप्रतिनिधींसाठी पात्रता आणि वय यांची मर्यादा असावी, तसेच त्यांना अधिकाधिक दोन वेळाच प्रतिनिधित्व करण्याची मुभा दिली पाहिजे.
क्षत्री समाज राष्ट्रीय महासंघाच्या साधारण सभेमध्ये सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मार्गदर्शन
समाज धर्माच्या मार्गावर चालला, तरच राष्ट्रात सुख-शांती अन् समृद्धी नांदेल ! – सद्गुरु (डॉ.) पिंगळे
क्षत्री समाज राष्ट्रीय महासंघाच्या केंद्रीय कार्य समितीच्या वतीने १८ व्या साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी सभेला संबोधित करतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, आपल्या धर्मात एक रहस्य सांगितले आहे, ते म्हणजे सुखस्य मूलं धर्मः (चाणक्यनीति, अध्याय १, श्लोक २) म्हणजे सुखाचे मूळ धर्मात आहे. व्यक्तीच्या जीवनात धर्म असेल, तर व्यक्ती सुखी होईल. परिवारातील सर्व घटक धर्माच्या मार्गावर चालले, तर परिवार सुखी होईल. अनेक परिवार आणि संघटना धर्माच्या मार्गावर चालल्या, तर समाज सुखी होईल अन् जेव्हा समाज आणि क्षेत्र धर्माच्या मार्गावर चालेल, तेव्हा आपल्या राष्ट्रात सुख-शांती अन् समृद्धी नांदेल. म्हणून आपल्याला सुख-शांती, विकास, प्रगती आणि आनंद हवा असेल, तर आपल्याला धर्माच्या मार्गावर चालावे लागेल.
सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, मनुष्याचे मन वेगळा विचार करत असते, त्याचे शरीर काही वेगळेच करत असते आणि बुद्धी निराळाच विचार करत असते. शरीर, कर्म आणि विचार यांच्यातील संघर्षच मनुष्याच्या अशांतीला कारण आहे. धर्माच्या मार्गावर चालल्याने हा संघर्ष संपतो.
लोकांनी निर्माण केलेल्या विकृत प्रथांमुळे कर्मकांडाला खर्चिक स्वरूप ! – सद्गुरु (डॉ.) पिंगळे
काठमांडू : क्षत्री समाजाचे श्री. राजेंद्र ओझा यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची भेट घेतली असता श्री. ओझा म्हणाले, धर्मातील रूढी, परंपरा महाग होत चालल्या आहेत. कर्मकांड खर्चिक झाले आहे. यावर उपाय काढला पाहिजे, असे लोकांना वाटत आहे. यावर सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, कर्मकांड खर्चिक नाही, तर लोकांनी निर्माण केलेल्या विकृत प्रथांमुळे कर्मकांडाला खर्चिक स्वरूप प्राप्त झाले आहे. धर्मशास्त्रात कर्मकांडाच्या पुढे उपासनाकांडही सांगितले आहे. धर्मात अयोग्य काही नाही. धर्म अयोग्य गोष्टीत सुधारणा करण्याचे शिकवतो. जनतेने त्यांच्या समोर राम आणि कृष्ण यांचा आदर्श ठेवावा; कारण जनतेचे भविष्य हेच देशाचे भविष्य असते. हिंदूंनी धर्म समजून घेण्यासाठी धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे.
पोखरा येथील फेब गेट हॉटेल स्कूलचे व्यवस्थापक आणि हमरा कुरा या न्यूज पोर्टलचे संपादक यांची घेतली सदिच्छा भेट !
पाद्य्रांकडून होणार्या लैंगिक अत्याचारांची माहिती लोकांना दिल्यास जागृती होईल ! – सद्गुुरु (डॉ.) पिंगळे
काठमांडू : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी पोखरा येथील फेब गेट हॉटेल स्कूलचे व्यवस्थापक श्री. विवेक पौडेल आणि धर्मांतराच्या विरोधात कार्य करण्याची इच्छा असणारे त्यांचे मित्र श्री. श्रेयस्कर सिंह यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी समिती करत असलेले धर्मरक्षणाचे कार्य आस्थेने जाणून घेतले. या वेळी धर्मांतर थांबवण्यासाठी सर्वांना धर्मशिक्षित करणे हाच एकमात्र उपाय आहे, असे सद्गुुरु (डॉ.) पिंगळे यांनी सांगितले.
सद्गुुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, जगभरात विविध चर्चमध्ये पाद्य्रांकडून लहान मुले आणि नन्स यांच्यावर होणार्या लैंगिक अत्याचारांची माहिती लोकांना देणे आवश्यक आहे. तसेच या घटनांसाठी पोप करत असलेल्या क्षमायाचनांच्या बातम्यांची कात्रणेही लोकांना दाखवू शकतो. त्यामुळे लोकांमध्ये जागृती होईल. या माध्यमातून त्यांना हिंदु धर्माचे महत्त्वही लक्षात येईल.
ज्ञान झाल्यावरच संघटन आणि धर्माचे कार्य होते ! – सद्गुरु (डॉ.) पिंगळे
काठमांडू : हमरा कुरा या न्यूज पोर्टलचे श्री. गोविंद अधिकारी यांनी २४ ऑगस्ट या दिवशी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची भेट घेऊन हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतले. तसेच त्यांनी विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसनही केले. या वेळी सद्गुरु
(डॉ.) पिंगळे म्हणाले,
१. सर्वांना एकत्र करतो तो खरा धर्म. नवीन संघटना निर्माण करून प्रतिस्पर्धी होण्याऐवजी सर्व संघटनांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे.
२. आपण संप्रदायात अडकल्यामुळे, धर्माविषयी अनभिज्ञ असल्यामुळे आणि अधर्माचरण केल्याने धर्माची हानी होते.
३. ज्ञान झाल्यावरच संघटन होते आणि धर्माचे कार्य होते. हिंदु धर्माचे कार्य करण्यासाठी आधी धर्म समजून घेतला पाहिजे. आपल्या धर्मात स्वातंत्र्य आहे; म्हणून काहीही करून चालत नाही. भ्रमणभाषमधील सीमकार्ड काढून कागदाचा तुकडा घातला, तर भ्रमणभाष चालेल का ? स्वतःला मोठे समजले की सर्व संपले.