पाकशी हातमिळवणी करणारे खलिस्तानवादी आता का बोलत नाहीत ? कि त्यांना अशा घटना मान्य आहेत ? पाकप्रेमात आकंठ बुडालेले काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू पाकमधील शिखांवरील अत्याचारांविषयी तोंड का उघडत नाहीत ?
लाहोर (पाकिस्तान) : पाकच्या ननकाना साहिब येथे भगवान सिंह या शीख धर्मगुरूंच्या जगजीत या मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर तिचा महंमद एहसान या मुसलमान तरुणाशी विवाह लावण्यात आला. आता तिचे नाव आयशा ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर पाक आणि भारत येथील शिखांकडून संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही पाकच्या सिंध आणि खैबर पख्तूख्वा प्रांतांतून हिंदु आणि शीख तरुणींचे अपहरण करत बळजोरीने धर्मांतर करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
१. भगवान सिंह यांच्या कुटुंबियांनी ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करत घटनेची माहिती दिली आहे. या वेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडेही साहाय्य मागितले आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सूत्र जागतिक स्तरावर हाताळावे, अशी विनंती केली आहे. धर्मांतर केले नाही, तर तुझ्या कुटुंबियांची गोळ्या घालून हत्या करू अशी धमकी मुलीला देण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला आहे.
२. या मुलीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात ही मुलगी डोक्यावर काळा दुपट्टा घेऊन महंमद एहसान याच्या शेजारी बसलेली दिसत आहे. मी स्वेच्छेने विवाह करत आहे. मी १९ वर्षांची असून वडिलांच्या घरातून निघतांना कोणतेही दागिने किंवा संपत्तीची कागदपत्रे आणलेली नाहीत, असे ती या व्हिडिओमध्ये सांगत आहे.
३. मुलीचा भाऊ मनमोहन सिंह यांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीत तिचे वय १६ असल्याचे सांगितले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी एहसान आणि इतर ६ जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तक्रार करूनही पोलिसांनी त्याकडे लक्ष दिले नाही, असे या कुटुंबाने म्हटले आहे.
गुन्हेगारांवर कारवाई व्हावी ! – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह
या घटनेविषयी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, या प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे. मी याविषयी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याची चर्चा केली आहे. तसेच परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनाही आवाहन केले आहे की, त्यांनी पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे हे सूत्र मांडावे.
पाकने दुसर्यांकडे बोट दाखवण्याऐवजी स्वतःच्या घराकडे पहावे ! – भारत
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार याविषयी म्हणाले की, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या समवेत अशा घटना सातत्याने होत आहेत. ही घटना त्याचाच भाग आहे. पाकने (धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भात) दुसर्यांकडे बोट दाखवण्याऐवजी स्वतःच्या घरात पहावे, जेथे आग लागली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात