नागपूर : येथील उपायुक्त श्री. राम जोशी यांना गणेशोत्सवात होणारी श्री गणेशमूर्तींची विटंबना रोखली जावी, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे निवेदन वाचतांना त्यांनी त्यातील महत्त्वाच्या सूत्रांना अधोरेखित करून, मुंबई महापालिकेने तलावाच्या एका भागात जाळी टाकून त्याच भागात श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाचे केलेले नियोजन योग्य आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
समितीच्या कार्यकर्त्यांनी कागदी लगद्याच्या मूर्तींच्या विसर्जनानंतर होणारे प्रदूषण, तसेच होणारी विटंबना, शाडू मातीची मूर्ती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती यांविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, शाडूची मूर्तीच वापरणे योग्य आहे. त्याच्या प्रसारासाठी नागपूर महापालिकाही प्रयत्न करत आहे. यासाठी नागपूर महापालिकेकडून शहरात निरनिराळ्या ठिकाणी शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी कक्ष उभारण्यात येणार आहेत. या कक्षांच्या ठिकाणी तुम्हीही महापौरांच्या अनुमतीने प्रबोधन कक्ष उभारू शकता.
प्रत्येक वर्षी महापालिकेच्या कृती समितीमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सहभागाविषयी उपायुक्तांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच निवेदनासंदर्भातील पुढील प्रयत्न स्वतः पुढाकार घेऊन करण्याचे आश्वासन दिले.