नैसर्गिक आपत्तीत कृत्रिम सजावट, तसेच बाह्य देखाव्यांभर भर न देता धार्मिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यावर भर द्या ! – प्रसाद कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) : सध्या समाजबांधव नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रस्त आहेत. समाजबांधव झळ सोसत असतांना गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करतांना कृत्रिम सजावट, तसेच बाह्य देखाव्यांभर भर न देता धार्मिक पद्धतीने उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. धर्मशास्त्रानुसार उत्सव साजरा केल्यास आपल्यावर निश्चितच श्री गणेशाची कृपा होईल, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी केले. शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने २९ ऑगस्ट या दिवशी संकल्पसिद्ध मंगल कार्यालय, येळाणे येथे गणेशोत्सव मंडळांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी हे आवाहन त्यांनी केले. या बैठकीसाठी ४५० हून अधिक मंडळांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी २०१८ मध्ये आदर्श गणेशोत्सव साजरा केलेल्या मंडळांचा सत्कार करण्यात आला. बैठकीसाठी पोलीस पाटील, शाहूवाडी पन्हाळा परिक्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कदम, पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख, तहसीलदार चंद्रशेखर सानप उपस्थित होते. तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी, गणेशोत्सव मंडळांनी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करावा. शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, तसेच अनावश्यक व्यय टाळून पूरग्रस्तांना साहाय्य करावे, असे आवाहन केले.