मुंबई : देहली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलेचा हार घालून काँग्रेसप्रणीत विद्यार्थी सेनेने केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नव्हे, तर समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांचा अपमान केला आहे. अशा देशद्रोह्यांना कठोर शासन करा, अशी मागणी समस्त स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी जनसमूहाकडून करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ २८ ऑगस्ट या दिवशी दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर सावरकरप्रेमींकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचा अवमान करणार्या अक्षय लकडा याला त्वरित अटक करण्याची मागणी आंदोलनात सहभागी झालेले समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि सावरकरप्रेमी यांनी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्यांची योग्यता काय ? – सौ. क्रांतीगीता महाबळ, मुंबई उपाध्यक्षा, हिंदु महासभा
अनेक क्रांतीकारकांनी सावरकर यांच्याकडून सशस्त्र क्रांतीची प्रेरणा घेतली आणि लाहोर भागात क्रांती घडवली. देशातील तरुणांना सैन्यामध्ये भरती होण्याचे आवाहन करून त्यांनी हिंदूंचे सैनिकीकरण केले. त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांना सैन्य मिळाले, त्याचे रूपांतर आझाद हिंद सेनेत केले. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली, त्यांची योग्यता काय ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी विटंबना करणार्यांना पकडावे आणि शिक्षा करावी.
सावरकर यांचा अवमान करणार्यांना कारागृहात घाला ! – दीप्तेश पाटील, हिंदू गोवंश रक्षा समिती
स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ देशाचे भारतरत्न नसून विश्वरत्न आहेत. त्यांना अखंड भारताचे स्वातंत्र्य हवे होते. त्यांचा अवमान करणार्यांना कारागृहात घाला. देशभक्त, कवी, नाटककार, साहित्यिक, समाजसुधारक अशा अष्टपैलू सावरकर यांच्या विटंबनेचा शासनाने विरोध केला पाहिजे. काँग्रेसने वेळोवेळी सावरकर यांचा अपमान केला आहे. काँग्रेसच्या काळात सावरकर यांच्या पंक्ती अंदमान निकोबार येथील भिंतीवरून पुसल्या; मात्र त्या आमच्या मनातून पुसू शकणार नाही.
काँग्रेसने कितीही प्रयत्न केला, तरी राष्ट्रप्रेमींच्या हृदयातून स्वातंत्र्यवीरांना हटवू शकत नाही ! – बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकाळात काँग्रेसने त्याचा छळ केलाच; परंतु त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतीकारकांचे मेरूमणी आहेत. काँग्रेसने कितीही प्रयत्न केला, तरी राष्ट्रप्रेमींच्या हृदयातून त्यांना हटवू शकत नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान देशासाठी लांच्छनास्पद ! – सुनील पवार, अध्यक्ष, शिवराज्याभिषेक समिती
ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले, त्यांच्या पुतळ्याची विटंबना, हे सर्व देशाला लांच्छनास्पद आहे. एन्.एस्.यू.आय. ही विद्यार्थी संघटना हिंदुविरोधी आणि पाकिस्तानधार्जिणी आहे. शासनाने लकडा याला अटक करावी. तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवू.
या वेळी श्री शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळीचे श्री. प्रभाकर भोसले, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. कैलास जाधव, श्री. प्रकाश सावंत, श्री. देवेंद्र वारेकर हिंदु महासभेचे मुंबई कार्यवाहक श्री. दिलीप मेहेंदळे, हिंदुमहासभेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री. अरुण माळी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. वरील संघटनांसह या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री हिंदवी स्वराज्य सेना, स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक समिती आदी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अन् राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते. अनेकांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी देत या आंदोलनाला पाठिंबा दिला.