श्री गणेशमूर्ती शाडू मातीची बनवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा ! – मिलिंद कुलकर्णी, निवासी संपादक, दैनिक लोकमत
जळगाव : येथील दैनिक लोकमतच्या कार्यालयात ३० ऑगस्ट या दिवशी आदर्श गणेशोत्सव या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात सनातन संस्थेच्या वतीने श्री. श्रेयस पिसोळकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन दैनिक लोकमतचे निवासी संपादक श्री. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. श्री. कुलकर्णी या वेळी म्हणाले, गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय असून, या उत्सवाच्या माध्यमातून सर्वांनी पावित्र्य जपायला हवे . अध्यात्मशास्त्राच्या आधारे श्री गणेशमूर्ती चिकणमाती अथवा शाडूच्या मातीची बनवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. हा उत्सव चांगला, नीटनेटकेपणाने साजरा करणे ही लोकमतची भूमिका आहे.
इको फ्रेंडलीच्या नावाखाली कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती ही पूर्णतः प्रदूषणकारी ! – सौ. क्षिप्रा जुवेकर
सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी प्रारंभी आदर्श गणेशोत्सव अभियानाची माहिती दिली. सौ. जुवेकर म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा मन की बात या कार्यक्रमातून शाडू मातीची मूर्ती आणण्याचे देशवासीयांना आवाहन केले होते.
तरीही काही पुरोगामी संघटना शाडू मातीच्या मूर्तीला प्रोत्साहन देतांना दिसत नाहीत. गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी जे कृत्रिम हौद बनवले जातात, त्यात अमोनिअम बायकार्बोनेटसारख्या घातक रसायनांचा वापर केला जातो. यातून प्रदूषणात अधिकच भर पडत आहे, हे शासनाने लक्षात घेतले पाहिजे. दुसरीकडे इको फ्रेंडलीच्या नावाखाली कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती ही पूर्णतः प्रदूषणकारी आहे. याविषयी लोकांमध्ये जागृती करण्याचे काम समिती करत आहे.
गणेश ॲपच्या माध्यमातून धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची सर्व माहिती भक्तांना उपलब्ध ! – श्रेयस पिसोळकर
सनातन संस्थेचे श्री. श्रेयस पिसोळकर म्हणाले, संस्था प्रतिवर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत जनजागृती अभियान राबवते. या अंतर्गत प्रवचन, सामूहिक नामजप, धर्मशिक्षण देणारे फलक लावणे या माध्यमातून हे कार्य चालू आहे. यावर्षी जळगाव येथे समितीच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षण, स्वरक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गणेश ॲपच्या माध्यमातून धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची सर्व माहिती भक्तांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शाडू मातीची गणेशमूर्ती घेण्याविषयी शाळांमधूनही जागृती ! – डॉ. विलास नारखेडे
राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून कार्य करणारे डॉ. विलास नारखेडे म्हणाले, शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाडूच्या मूर्तीचे महत्त्व सांगून त्यांना शाडू मतीची मूर्ती घेऊन उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहित करायला हवे. राष्ट्रीय हरित सेना शाळा-शाळांमधून याविषयी जागृती करण्याचे काम करत आहे.
गणेशोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत जागृतीचे कार्य करत आहोत ! – मोहन तिवारी, सार्वजनिक उत्सव महामंडळ
सार्वजनिक उत्सव महामंडळाचे सदस्य आणि शिवसेनेचे श्री. मोहन तिवारी म्हणाले, ज्या मंडळांत चित्रपटांतील गाणी लावणे, डीजे लावणे, मंडपात जुगार खेळणे यांसारखे अपप्रकार होतात, तेथे हिंदु जनजागृती समितीसमवेत जागृती करण्याचे कार्य आम्ही करत आहोत. निर्माल्य दूषित पाण्यात विसर्जन होते, हे होऊ नये, यासाठी महामंडळ उत्सव समितीच्या वतीने योग्य ते प्रशासकीय साहाय्य घेऊन आदर्श गणेशोत्सव साजरा करू.
चर्चासत्राला श्री अष्टविनायक शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय हरित सेनेचे अशासकीय सदस्य श्री. सुनील रामदास वाणी, संवेदना बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. दीपक पाटील, कुतूहल फाऊंडेशनचे श्री. महेश शांताराम गोरडे, ब्राह्मण एकता मंडळाचे काशीनाथ झारे गुरुजी, दर्जी फाऊंडेशनचे श्री. गोपाळ दर्जी, श्री. प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.