- श्री गणेशाचे अशा प्रकारे विडंबन करणार्यांवर श्री गणेशाची कृपा होईल का ?
- श्री गणेशाला मानवी रूपात दाखवणे, हे त्याचे विडंबनच आहे. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच अशा शास्त्रविसंगत कृती घडतात आणि हिंदू हे देवाचा कृपाशीर्वाद मिळण्यापासून वंचित रहातात. त्यामुळे गणेशोत्सवाचा खर्या अर्थाने लाभ होण्यासाठी प्रत्येक धार्मिक कृतीमागील शास्त्र समजून घेणे आवश्यक आहे !
(हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
मुंबई : येथील एका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्याने वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गेल्या वर्षीही त्यांनी या प्रकारच्या गणेशमूर्तीची स्थापना केली होती. काही प्रसिद्धीमाध्यमांनी ही एक अनोखी संकल्पना असल्याचे सांगत त्यादृष्टीने याचे वार्तांकन केले आहेे. (धार्मिक उत्सवांचा हिंदूंना सर्वंकष उत्कर्षासाठी लाभ व्हावा, या हेतूने पत्रकारिता होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांनी पुरोगामित्वाची झापडे दूर सारून धर्मशास्त्राला पूरक असे वार्तांकन करायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
याविषयी पोलीस अधिकारी म्हणाले, मी ५ वीत शिकत असतांना माझ्या वर्गशिक्षकांनी गणेशोत्सवात शिक्षकाच्या वेशातील गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यावरून मला ही संकल्पना सुचली. (शिक्षकांना योग्य दृष्टीकोन नसल्याने विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत नसल्याचे उदाहरण ! निदान पुढची पिढी तरी धर्मशिक्षित व्हावी, यासाठी शासन शालेय शिक्षणात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलीस विभागात काम करत असतांना त्याच क्षेत्रातील गणपति बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्याचे स्वप्न मनात होते. यासाठी ४ – ५ वर्षांपासून मी प्रयत्न करत होतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात