हिंदु जनजागृती समितीची ‘आदर्श गणेशोत्सव’ मोहीम
चिंचवड : गेल्या काही वर्षांपासून श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद किंवा अमोनियम बायकार्बोनेट यांसारख्या अशास्त्रीय पर्यायांचा प्रसार करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी, तसेच महापालिका प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समितीच्या कार्याचे कौतुक करत ‘शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तीच्या वापरावर भर दिला जावा’, यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी शाडूच्या मातीच्या श्री गणेशमूर्ती बनवण्याच्या संदर्भात शाळांमध्ये जाऊन आम्ही प्रशिक्षण दिले होते. जे मूर्तीकार शाडूच्या मूर्ती वितरण करतात त्यांच्या विक्री कक्षाला महापालिकेकडून विशेष सूटही देण्यात येते.’’ या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री रघुनाथ ढोबळे, अशोक कुलकर्णी, शैलेश येवले उपस्थित होते.
याच विषयाला अनुसरून महापौर राहुल जाधव, आमदार गौतम चाबुकस्वार, सभागृह नेते एकनाथ पवार, विधी आणि न्याय विभागाच्या सौ. अश्विनी बोबडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनाही निवेदन देण्यात आले.