शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांनी प्रवेश करण्याचे प्रकरण
डेहराडून (उत्तराखंड) : कायदा एका ठिकाणी असून हिंदूंच्या परंपरांना विशिष्ट स्थान आहे. आपण धर्मशास्त्राला अनुसरून चालतो. मंदिरांच्या प्राचीन शास्त्रीय परंपरांचे पालन व्हायला हवे. महिलांनी आपल्या अधिकारक्षेत्रात रहायला हवे. त्यांनी शनिदेवाच्या चौथर्यावर चढू नये, असे स्पष्ट मत ज्योतिष् आणि द्वारका पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.
शनिशिंगणापूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ३० मार्चला महाराष्ट्र शासनाला आदेश देत म्हटले, ज्याठिकाणी पुरुषांना प्रवेश मिळतो, त्याठिकाणी महिलांनाही प्रवेश मिळायला हवा. जर महिलांना शनिशिंगणापूर येथे प्रवेश नाकारायचा असेल, तर तसा कायदा करावा किंवा मंदिराच्या पावित्र्याचा प्रश्न असेल, तर येत्या दोन दिवसांत यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. यावर शंकराचार्यांनी वरील मत व्यक्त केले.
शंकराचार्य पुढे म्हणाले की, (भूमाता ब्रिगेडच्या) तृप्ती देसाई या नास्तिक असून त्या महिलांचे प्रतिनिधित्व करत नाहीत. त्यांचे मंदिरांमध्ये जाण्याचा प्रयत्न करणे, हे नाटक असून त्यामागे राजकारण आहे.
मी महिलाविरोधी नाही ! – शंकराचार्य
मी महिलाविरोधी नाही. स्त्री ही मुलगी असतांना देवीसमान असते. विवाहानंतर तिला राजराजेश्वरीचा सन्मान दिला जातो, तर वृद्ध झाली की, ती मातेसमान असते. जेथे स्त्रीचे पूजन होते, तेथे स्वत: देवता निवास करतात; परंतु प्रत्येकाने धर्माने घालून दिलेल्या आपल्या अधिकारक्षेत्रामध्ये रहायला हवे, असेही द्वारका पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज या वेळी स्पष्ट केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात