Menu Close

मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथे श्रीरामनाम संकीर्तन अभियान

मुंबई : मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथे श्रीरामनाम संकीर्तन अभियान राबवण्यात आले. दादर येथे २ ठिकाणी केलेल्या नामजपामध्ये १७ जण सहभागी झाले होते. येथील नामजपात धर्मशिक्षणवर्गाला येणार्‍या धर्मप्रेमी सौ. संगीता बशिर्बाद यांनी श्री गणेशचतुर्थीनिमित्त श्रीगणेशाच्या ५० नामपट्ट्या प्रायोजित केल्या. परळ येथे १८ ठिकाणी नामजप करण्यात आला. त्यासाठी १८२ जण उपस्थित होते.

नामजपानंतर जिज्ञासूंकडून  प्रश्‍न विचारून शंकानिरसन !

घोडपदेव येथील कापरेश्‍वर मंदिर आणि सिद्धेश्‍वर मंदिर येथे एका लयीत नामजप करण्यात आला. जप केल्याने आनंद मिळाला, असे उपस्थितांनी सांगितले. सिद्धेश्‍वर मंदिराच्या व्यवस्थापक सौ. रश्मी भिंगार्डे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सनातनच्या साधिका सौ. विजया मांजरेकर यांच्या निवासस्थानी नामजप झाल्यावर उपस्थितांनी जिज्ञासेने प्रश्‍न विचारून शंकानिरसन करून घेतले. बालाजी सोसायटीच्या कार्यालयात जप झाल्यावर कन्नड भाषिक महिलांनी सत्संगाची मागणी केली.

नामजप करतांना उपस्थितांना अनुभूती येणे !

१. नालासोपारा (पू.) येथील आचोळे गावातील श्री विठ्ठल मंदिरात नामजप करतांना भक्तगण
२. प्रभादेवी येथील जिज्ञासू सौ. रेशमा सावंत यांच्या घरी नामजप करतांना

वरळी येथे ३ ठिकाणी ४४ जणांनी नामजप केला. एका आजींना एका जागी अधिक वेळ बसता येत नाही; पण त्यांनी वाचक श्रीमती मनीषा कदम यांच्या घरी उपस्थितांसह १५ मिनिटे बसून श्रीरामाचा जप केला. येथील जपात सहभागी झालेल्या एका जिज्ञासू महिलेने तिच्या घरी नामजपाचे आयोजन करण्यास सांगितले. येथील बीडीडी चाळीतील श्रीमती रेशमा देवरुखकर यांच्या घरी नामजप करतांना अनेकांना सुगंधाची अनुभूती आली.

मीरारोड येथील उमेळा बावन देव मंदिर येथे करण्यात आलेल्या नामजपानंतर मंदिरात चैतन्य जाणवले, असे उपस्थितांनी सांगितले. डहाणू (पू.) येथे श्रावण संपल्यावर आठवड्यातून एकदा जप करूया, असे भजनी मंडळातील महिलांनी सांगितले. तसेच नामजप केल्यावर हलके वाटले, असेही एका महिलेने सांगितले.

पालघर जिल्ह्यात ८ ठिकाणी करण्यात आलेल्या जपामध्ये २०५ जण सहभागी झाले होते. नालासोपारा (पू.) येथील आचोळे गाव विठ्ठल मंदिर येथे करण्यात आलेल्या नामजपाच्या वेळी शांतता, स्थिरता, तसेच नामजपातील एकाग्रता अनुभवता आली, असे उपस्थितांनी सांगितले.

पश्‍चिम मुंबई येथील रामनामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पश्‍चिम मुंबई येथे ५ ठिकाणी झालेल्या नामजपात ७७ जण सहभागी झाले होते. दहिसरच्या अशोकवन येथील शिवमंदिरात करण्यात आलेला नामजप आवडल्याने प्रतिदिन १० मिनिटे नामजप करणार, असे उपस्थितांनी सांगितले. गिरनार दत्त मंदिराचे मालक म्हणाले, अधिकाधिक दिवस रामनाम अभियान घेण्यात यावे. बोरीवलीच्या वझिरा भागातील पूजा पाध्ये यांच्या योग शिकवणीच्या वर्गात नामजप घेतल्यानंतर तुमच्यामुळे आज आम्हाला रामनामाचा आनंद मिळाला, असे उपस्थितांनी सांगितले.

नामजपामुळे धर्मप्रेमी महिलेची भावजागृती होणे !

नामजपाची भावपूर्णपणे पूर्वसिद्धता करणार्‍या धर्मप्रेमी संज्योती काते यांची नामजपामुळे भावजागृती झाली. नामजप चालू झाल्यानंतर गल्लीमधील काही मुलांनीही त्यात सहभाग घेतला. दहिसर (पूर्व) येथील उपक्रमात २ वर्षांचा एक मुलगा पुष्कळ भावपूर्णपणे श्रीरामाचा जप करत होता. तो संपल्यावर एका मानसिक रुग्ण महिलेने नामजपातून अत्यंत समाधान मिळाल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन !

वाल्याचा वाल्मिकी कसा झाला, मम्मी-पप्पा न म्हणता आई-बाबा का म्हणायचे ?, एकत्रित नामजपाचे महत्त्व काय ?, यांविषयी सनातनच्या साधिका सौ. सुलभा सोनावणे यांनी त्यांच्या घरगुती शिकवणीसाठी येत असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्या वेळी ते एकाग्रतेने ऐकत होते.

नवी मुंबई आणि मध्य मुंबई येथील उपक्रमासही उत्स्फूर्त प्रतिसाद !

नवी मुंबई येथे ७ ठिकाणी नामजप करण्यात आला. या वेळी १०६ जण उपस्थित होते. नेरूळ येथील देवाडिगा भवन येथे ५० जणांनी नामजप केला. या ठिकाणासह सनातनच्या साधिका श्रीमती रागिणी सालियन यांच्या निवासस्थानी प्रत्येक मासाच्या दुसर्‍या शनिवारी नामजप करण्याचे ठरले आहे. कोपरखैरणे येथील सेक्टर ४ मध्ये वरदविनायक मंदिरात नामजप करण्यासाठी सहभागी झालेल्या कल्पना गोळे यांनी पुढील वेळेस १० जणांना घेऊन येणार, असे सांगितले.

मध्य मुंबई येथे २८ ठिकाणी करण्यात आलेल्या नामजपात ३११ जणांनी सहभाग घेतला. भांडुप गाव येथे रहाणारे कलावती आईंचे भक्त श्रीमती मटकर यांच्या घरी नामजप करतांना श्रीरामाचे छायाचित्र आणि फलक पाहून २ जणांनी अरे वा ! चांगले कार्य आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.

नामजप करवून घेतल्याने तो एका लयीत झाला. त्यामुळे पुष्कळ आनंदी वाटले, असे नाहूर येथे नामजपासाठी आलेल्या महिलांनी सांगितले. मुलुंड येथील धर्मप्रेमी सौ. शकुंतला कराड यांच्या घरी नामजपासाठी आलेल्या महिलांनी श्री गणेशाची मानसपूजा कशी करायची ?, हे विचारून घेतले.

विक्रोळी येथील जिज्ञासू सौ. प्रभा वंगारी यांच्या निवासस्थानी नामजपानंतर २५ जणांना साधना सांगण्यात आली. घाटकोपर येथील सनातनच्या साधिका आशा हांडे यांच्याकडे नामजपासाठी आलेल्या एका जिज्ञासूने दुसर्‍या दिवशी स्वतःच्या घरी नामजपाचे आयोजन केले.

काही जणांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात यावा, असे वाटल्याने त्यांनी त्याविषयी मोकळेपणाने चर्चाही केली. मुलुंड पूर्वेकडील गांधीनगर येथील श्रीराम मंदिरात नामजपाच्या वेळी मंदिरात आलेला ५-६ वर्षांचा कु. कुशल हेगडे हा मोठ्याने आणि एकाग्रतेने जप करत होता.

नामजपामध्ये सहभागी झाल्याने तणावग्रस्त युवकाचे आत्महत्या करण्याचे विचार निघून जाणे !

नायगाव येथील नामजपामध्ये अनुमाने २६ वर्षीय युवक सहभागी झाला होता. नामजप झाल्यानंतर तो म्हणाला, २ दिवसांपासून मी पुष्कळ तणावात होतो. आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत आलो होतो; मात्र या नामजपामुळे मनातील आत्महत्येचे विचार निघून गेले. मनातील नकारात्मक विचार जाऊन मन स्थिर आणि शांत झाले. मला अंतर्मनातून जे समाधान मिळाले, ते मी शब्दांत सांगू शकत नाही. या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आवाजातील रामनामाचा जप ऐकून त्याने असा आवाज मी यापूर्वी कधीच ऐकला नाही, असे सांगितले. याच नामजपसंकीर्तनाला आलेल्या एका व्यक्तीने अनुभूती सांगितली. ती म्हणाली, मी नियमित रामरक्षास्तोत्र आणि हनुमानस्तोत्र म्हणतो; मात्र इतक्या वर्षांत मला डोळे भावपूर्ण मिटता आले नाहीत. हा नामजप ऐकूनच एकाग्रतेने माझे डोळे मिटले आणि भावपूर्ण जप चालू झाला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *