पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या घोटाळ्याचे प्रकरण
शिवसेनेचे कोल्हापूर येथील आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांची घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची विधानसभेत जोरदार मागणी
मुंबई – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून घोटाळा झाल्याच्या कालावधीत समितीवर कार्यरत असणारे तत्कालीन अधिकारी आता राज्याच्या विविध भागांत कार्यरत आहेत. त्यामुळे याची चौकशी करण्यास विलंब होत असला, तरी घोटाळ्याची चौकशी जलदगतीने चालू आहे. अहवाल प्राप्त होताच सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल. कोणालाही पाठीशी घालण्याचा राज्यशासनाचा उद्देश नाही, असे उत्तर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात एका लक्षवेधी सूचनेवर शिवसेनेचे कोल्हापूर येथील आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिले.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले श्री महालक्ष्मी देवस्थान न्यास आणि कुलदैवत श्री ज्योतिबा यांसह ३ सहस्र ६७ मंदिरांचे व्यवस्थान पहाणार्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्रंचड मोठा घोटाळा केल्याचे हिंदु विधीज्ञ परिषदेने उघड केले होते.
या संदर्भात शिवसेनेचे कोल्हापूर येथील आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी एप्रिल २०१५ मध्ये विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याला अनुसरून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाच्या वतीने सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. या संदर्भात एक वर्ष उलटल्यानंतरही काही कारवाई झाल्याचे वा कोणाला अटक झाल्याचे समोर आले नव्हते. त्यामुळे ३१ मार्चला विधानसभेत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील श्री नाथ देवस्थानाच्या लक्षवेधी सूचनेवर बोलतांना शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या भ्रष्टाचाराचे सूत्र पुन्हा एकदा जोरदारपणे मांडले.
या वेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने भूमी, दागिने आणि अन्य अनेक संदर्भात प्रचंड घोटाळे केले आहेत. या संदर्भात एक वर्षापूर्वी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्या चौकशीचे पुढे काय झाले ? या घोटाळ्याच्या प्रकरणी कोणावर कारवाई करण्यात आली ? कोणती कारवाई झाली, या संदर्भात काहीही समजलेले नाही, तसेच शासनाला या संदर्भातील चौकशी अहवाल कधी प्राप्त होणार आहे ? त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.
सांगलीतील देवस्थान जमिनींच्या अवैध विक्रीच्या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी चालू ! – मुख्यमंत्री
आटपाडी तालुक्यातील (सांगली) दिघंची येथील श्री नाथ देवस्थानच्या जमिनीची बनावट कागदपत्रे वर्ष २००८ मध्ये चुकीच्या नोंदी करून अनधिकृतपणे विक्री केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी चालू आहे. त्याचा अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मार्चला विधानसभेत दिली. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस, शशिकांत शिंदे आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात