राष्ट्ररक्षणासाठी कृतीशील असणारी गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे !
पणजी : गोव्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे राष्ट्ररक्षणासाठी कृतीशील आहेत. काणकोण तालुक्यातील चार रस्ता गणेश मंडळ आणि राजबाग तारीर गणेश मंडळ यांनी क्रांतीकारकांच्या कार्याविषयी अमूल्य अशी माहिती देणारे हिंदु जनजागृती समितीनिर्मित फलक लावले आहेत.
चार रस्ता गणेश मंडळ येथे अशा स्वरूपाचे एकूण ४, तर राजबाग तारीर गणेश मंडळ येथे एकूण ७ फ्लॅक्स फलक लावण्यात आले आहेत. राजबाग तारीर गणेश मंडळ येथे लावण्यात आलेल्या फ्लॅक्स फलकांमध्ये छत्रपति शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा बाहेर काढत असल्याचे चित्र असलेल्या फ्लॅक्स फलकांचा समावेश आहे. याविषयी चार रस्ता गणेश मंडळाचे पदाधिकारी अजय भगत म्हणाले,हिंदु जनजागृती समितीचे हे फलक समाजाला दिशादर्शक आहेत, तसेच ते बोधप्रद आहेत. राजबाग तारीर गणेश मंडळाचे दीपक पागी म्हणाले, या फलकांमुळे विद्यार्थ्यांना अमूल्य असे ज्ञान मिळत आहे. हे फलक खूप उपयुक्त आहेत.
ठाणे, सत्तरी येथील सार्वजनिक गणेशोत्सवात ३७० कलम – काल, आज आणि उद्या, या विषयावर प्रवचनाचे आयोजन
ठाणे, सत्तरी येथील सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळाने ४ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ३७० कलम – काल, आज आणि उद्या, या विषयावर सत्तरी तालुक्यातील व्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता शिवाजी देसाई यांच्या प्रवचनाचे आयोजन केले होते. ठाणे, सत्तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेल्या ६ वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील विषयांना अनुसरून व्याख्यानमालेचे आयोजन करत आहे. अधिवक्ता शिवाजी देसाई हे या व्याख्यानमालेत मार्गदर्शन करतात.