Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या मूर्तीविसर्जन मोहिमेस भाविकांचा प्रतिसाद !

संततधार पावसाने घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांची तारांबळ !

कोल्हापूर : गेले ४ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा दुथडी भरून वहात आहे. नदीचे पाणी नदीच्या पात्राबाहेर आल्याने महापालिकेने मूर्तीदानासाठी उभारलेला मंडप पूर्णत: नदीपात्रात बुडून गेला होता. पाणी नदीच्या पात्राबाहेर आल्याने नदीजवळ जाणे भाविकांना शक्य होत नसल्याने मूर्तीविसर्जन करण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत होती.

कोल्हापूर महापालिकेने श्री गणेशमूर्ती दानासाठी उभा केलेला मंडप आणि यंत्रणा पाण्याखाली !

मोठ्या प्रमाणात पाऊस असतांनाही हिंदु जनजागृती समितीने पंचगंगा घाटासह अन्य ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यासाठी मोहीम राबवली. भर पावसात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भाविकांचे प्रबोधन केले. याला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. भाविकांनी डोक्यावर गणेशमूर्ती घेऊन त्या पंचगंगेत आत उतरून विसर्जन केले.

हिंदु जनजागृती समितीने भाविकांच्या प्रबोधनसाठी उभारलेला फलक

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाविकांना ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे मूर्तीविसर्जनासाठी आवाहन करण्यात येत होते, तसेच मूर्ती विसर्जनाचे महत्त्व सांगणारा मोठा फ्लेक्सचा फलक लावण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात पाऊस असतांना, तसेच नदीचे पाणी पात्रबाहेर आलेले असतांनाही भाविकांनी अपार उत्साहात श्री गणेशमूर्ती विसर्जन केले.

गडहिंग्लज आणि सांगली येथेही भाविकांचा कल मूर्ती विसर्जनाकडेच !

१. गडहिंग्लज येथे नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम कुंड करण्यात आले होते. येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाविकांचे प्रबोधन करण्यात आले. या प्रबोधनालाही भाविकांनी प्रतिसाद दिला.

२. सांगली येथे कृष्णा घाटावर महापालिकेच्या वतीने मूर्ती दान घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ६ सप्टेंबर या दिवशी या मोहिमेत काही नगरसेवकही सहभागी झाले होते; मात्र बहुतांश भाविकांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनच करणे पसंत केले.

वरूणदेवता प्रसन्न झाल्याने भाविकांकडून श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन

पुण्यात कृत्रिम हौद रिकामेच

पुणे : श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विसर्जन घाटांवर प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत समितीचे कार्यकर्ते प्रबोधनपर फलक हातात धरून विसर्जन घाटांवर उभे होते. एस्.एम्. जोशी पूल, भिडे पूल, सिद्धेश्‍वर घाट येथे, तसेच काकडे पार्क, बिर्ला घाट, रावेत आणि औंध येथील घाट या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. गणरायाच्या कृपेने २-३ दिवस पाऊस चांगला झाल्याने मुठा, तसेच पवना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे अनेक भाविकांनी प्रथेप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात म्हणजे नदीत विसर्जन करायला प्राधान्य दिल्याचे पहायला मिळाले.

प्रबोधन करताना समितीच्या कार्यकर्त्या

अनेक भाविकांनी वहात्या पाण्यात विसर्जन करण्यामागचे अध्यात्मशास्त्र समितीच्या कार्यकर्त्यांकडून जिज्ञासेने जाणून घेतले. नदीला चांगल्या प्रमाणात पाणी असले, तरी अनेक ठिकाणी विसर्जन करण्यासाठी होडीची सोय उपलब्ध करून न दिल्याने भाविकांची अडचण होत होती.

श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करणार्‍या काही भाविकांच्या प्रतिक्रिया

निसर्गाने यंदा एवढे पाणी उपलब्ध करून दिल्याने प्रथेप्रमाणे श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन केले. – एक भाविक

कृत्रिम हौदातील पाणी अस्वच्छ आणि घाणेरडे दिसत आहे. याउलट नदीचे स्वच्छ आणि खळाळते पाणी आहे. त्यामुळे नदीतच विसर्जन केले. – श्री. संदीप मंडवार

हौदातील मूर्तींचे गौडबंगाल !

दान म्हणून घेतलेल्या श्री गणेशमूर्ती ट्रकमधून पुलावरून खाली टाकल्याने त्यांची कशी घोर विटंबना होते हे गेली दोन वर्षे पुण्यात उघड होत आहे !

श्री गणरायाच्या मूर्तींची विटंबना करणार्‍या मूर्तीदान उपक्रमावर प्रशासन बंदी का आणत नाही ? एवढा प्रचंड पाऊस पडल्यावर आणि नदीला पुष्कळ पाणी असल्यावर मूर्ती काठावर कशा रहातील ?

दुपारी ४ च्या सुमाराला महापालिकेचा एक ट्रक एस्.एम्. जोशी पूल येथे विसर्जन घाटावर आला. त्यामध्ये अनेक श्री गणेशमूर्ती होत्या. त्या पिवळ्या ताडपत्रीने झाकण्यात आल्या होत्या. ट्रकमधील श्री गणेशमूर्ती नदीत विसर्जित केल्या जाणार होत्या; पण घाटावरील महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी तसे करू दिले नाही आणि तो ट्रक परत पाठवला. याविषयी महापालिका कर्मचार्‍यांकडे चौकशी केल्यावर त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली; पण अधिक चौकशी केल्यावर मात्र ‘हौदातील श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणल्या होत्या; पण नदीचे पाणी अल्प झाल्यावर त्या काठाला रहातात. श्री गणेशमूर्तींविषयीचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतात. त्याविषयी आम्हाला काही ठाऊक नाही’, असे सांगत या विषयावर पडदा टाकला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *