सोलापूर : आपल्या देशात पुष्कळ साधनसंपत्तीसह बुद्धीसंपत्तीही अलोट आहे. अमेरिकेच्या संशोधन मंडळातील ११ जणांतील ९ सदस्य हे हिंदुस्थानचे आहेत. यावरून याची प्रचीती येते. जगातील सर्व शास्त्रांची जन्मभूमी हिंदुस्थान आहे. या देशाच्या अचूक कालमापनपद्धतीचा जगाने स्वीकार केला आहे. एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असल्याने अमेरिकेने त्या दिवशी केलेला प्रयोग यशस्वी झाला, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले. ते येथील अथर्व गार्डन येथे श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने आयोजित बैठकीत बोलत होते.
या वेळी ते म्हणाले की, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रीच्या वेळी काढण्यात येणार्या दुर्गामाता दौडीमध्ये यावर्षी सोलापूरमध्ये मोठा सहभाग अपेक्षित आहे. हा सहभाग वाढल्यास देशाला बळ लाभेल. शिवरायांच्या जन्माच्या वेळी जिजाऊंनी देवाकडे स्वत:च्या संसारासाठी नव्हे, तर हिंदुस्थानच्या संसारासाठी म्हणजेच राष्ट्र-धर्मासाठी मागणे मागितले होते. अशा थोर व्यक्तींचा आदर्श समाजाने घेण्याची आवश्यकता आहे.
‘दैनिक सनातन प्रभात किती जण वाचतात ?’ – पू. संभाजीराव भिडेगुरुजींचा उपस्थितांना प्रश्न
भारताच्या वैभवाविषयी माहिती सांगतांना पू. गुरुजींनी भाषणामध्ये ‘दैनिक सनातन प्रभात किती जण वाचतात ?’, असा प्रश्न उपस्थितांना विचारला आणि ८ सप्टेंबर या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधील ‘आर्य बाहेरून आलेले नाहीत ! – पुरातत्व खात्याच्या अभ्यासानंतर निष्कर्ष’ या पहिल्या पृष्ठावरील बातमीचा संदर्भ दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात