गणेशोत्सवाच्या निमित्ताने १६० हून अधिक गणेश मंडळांना संपर्क
कोल्हापूर : गणेशोत्सव कालावधीत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ५० हून अधिक प्रवचने घेण्यात आली. तसेच विविध गणेश मंडळे, गावांमधील तरुण मंडळे, महाविद्यालय येथे बैठका, वैयक्तिक संपर्क यांचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन निर्मित सात्त्विक उत्पादने, ग्रंथ यांचेही ठिकठिकाणी प्रदर्शन लावण्यात आले. गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळे, प्रशासन, पोलीस यांना निवेदन देण्यात आले. ३१ ठिकाणी नियमित फलकप्रसिद्धी चालू आहे. याला गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी प्रवचन ऐकून श्री गणेशाविषयी महत्त्वपूर्ण माहिती समजली असे सांगून श्री गणेशमूर्ती विसर्जनच करणार असे मत व्यक्त केले.
१. शिरोली, हालोंडी, हेर्ले या गावांत गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना भेटून प्रोजेक्टरद्वारे आदर्श गणेशोत्सवाविषयी प्रबोधन करण्यात आले. हेर्ले या गावात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे यांनी प्रवचन घेतले, तर बांधकाम अभियंता श्री. आनंद पाटील यांनी ‘आपत्काळातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. या गावात उपसरपंच श्री. विजय भोसले यांनी सहकार्य केले.
शिरोली येथे शिवसेना तालुका संरक्षण समितीचे श्री. दीपक यादव यांनी याचे नियोजन केले, तर हालोंडी येथे धर्मप्रेमी श्री. सचिन कोळी यांनी याचे नियोजन केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. जे.बी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. परीट उपस्थित होते. शिरोली येथे गणेश मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादने आणि सनातन पंचांग भेट देण्यात आले.
नागाव येथे ‘मर्द मराठा ग्रुप’ आणि ‘सावंत ग्रुप’ गणेशोत्सव मंडळात प्रवचन घेण्यात आले. दोन्ही मिळून २७५ भाविक उपस्थित होते. याच्या नियोजनात नागावमधील धर्मप्रेमी सौ. अरुणा गुडाले आणि सौ. जयश्री सावंत यांचा सहभाग होता.
२. इचलकरंजी येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी मणेरी मळा येथील मोरया गणेश मंडळ आणि कबनूर येथील आझाद हिंद गणेश मंडळ येथे प्रवचन घेतले. आझाद हिंद गणेश मंडळ येथे ८० भाविक उपस्थित होते. विश्व विनायक मंडळ येथे श्री गणेशाचा सामूहिक नामजप घेण्यात आला.
३. केर्ले येथील २, चिखली येथे १, तर वरणगे येथे ३ गणेश मंडळांमध्ये श्री. अमोल कुलकर्णी यांनी प्रबोधन केले. अण्णाभाऊ साठे तरुण मंडळातील उपस्थित भाविकांनी दसरा झाल्यावर गावात मोठा कार्यक्रम घेऊ असे सांगितले.
४. औरनाल येथील गावात पुष्कळ पाऊस पडत असतांनाही गावातील गणेश मंडळात हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजित धुळाज यांनी प्रवचन घेतले. या वेळी २५ धर्मप्रेमी उपस्थित होते. इंचनाळ येथे माजीसैनिक श्री. दत्तात्रेय यांनी पुढाकार घेऊन प्रवचनाचे नियोजन केले. येथेही पुष्कळ पाऊस असतांनाही भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
५. वारणानगर-नवे पारगाव येथील महात्मा गांधी रुग्णालय, तसेच तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय याठिकाणी रुग्णालयातील कामगार, तसेच महाविद्यालयातील शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी गणपतीची आरती झाल्यानंतर सनातन संस्थेच्या वतीने आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले. याचा लाभ २५० जणांनी घेतला.
६. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे शिपूर येथे विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळात १०० भाविकांची, गव्हाणी येथे झालेल्या प्रवचनात ७०, तर सौंदलगा येथील नृसिंह गणेशोत्सव मंडळात झालेल्या प्रवचनासाठी १५० भाविकांची उपस्थिती होती. सौंदलगा येथील प्रवचनासाठी धर्मप्रेमी श्री. प्रवीण चव्हाण यांनी पुढाकार घेतला.
७. कसबा सांगाव येथे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी प्रवचन घेतले. तेथे ६० भाविकांची उपस्थिती होती. ८. स्थानिक ‘एस्’ न्यूजवरही गणेशोत्सवाच्या निमित्ताने सिद्ध करण्यात आलेले विशेष धर्मसत्संग दाखवण्यात आले.
विशेष
१. नागदेववाडी येथील धर्मप्रेमी श्री. राहुल पाटील यांनी ‘श्री गणेशमूर्ती दान करणे अयोग्य कसे आहे’, याचे प्रबोधन करणारा फलक लावला आहे. यामुळे गावात मोठ्या प्रमाणात जागृती होण्यास साहाय्य झाले.
२. गणेशोत्सवाच्या निमित्ताने १५ गणेशमूर्तीकारांना, तसेच १६० हून अधिक गणेशोत्सव मंडळांना संपर्क करण्यात आले. यात ३० मंडळांनी भित्तीपत्रके लावली आहेत, २ मंडळात सामूहिक जप चालू आहे, एका मंडळात ८० सनातन पंचांग वितरण करण्यात आली, २ मंडळात अथर्वशीर्ष पठण चालू आहे, तर एका मंडळात ४० नामपट्ट्या वितरण करण्यात आल्या.
३. गणेशोत्सव जनजागृती अभियानात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच हितचिंतक यांनीही सहभाग घेतला.