मदुराई येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सभा
मदुराई (तमिळनाडू) : तमिळनाडूमध्ये धर्मांधांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदु नेत्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करील, असे प्रतिपादन शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. राधाकृष्णन् यांनी येथे केले. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मुदराई शाखेने २७ मार्चला एका सभेचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना श्री. राधाकृष्णन् बोलत होते.
ते पुढे म्हणाले, शिवसेनेचे प्रमुख धोरण हे राजकारण करणे नसून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संदेश राज्यातील सर्व जनतेपर्यंत नेणे, हा आहे. भाजपसह झालेल्या २ बैठकांमध्ये कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. भाजपच्या युतीमध्ये हिंदु नेत्यांना सहभागी करून घेण्याची मागणी निष्फळ ठरल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये ५० उमेदवार उभे करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. धर्मांतर, भ्रष्टाचार आदी गोष्टींवर बंदी घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही घोषणापत्रात केली आहे.
या वेळी मंडळ प्रमुख श्री. पद्मनाभन् उपस्थित होते. श्री. जयमपंडियन्, श्री.पी. कारन् आणि श्री. गणेश बाबू यांच्यासह २० वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या सभेस मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात