मुंबई येथे वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे प्रकरण
विलेपार्ले (मुंबई) : गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई येथील एका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्याने वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. गेल्या वर्षीही त्यांनी या प्रकारच्या गणेशमूर्तीची स्थापना केली होती. या संदर्भातील वृत्त ४ सप्टेंबरच्या दैनिक सनातन प्रभात मध्ये प्रसिद्ध झाले होते. श्री गणेशमूर्तीचे अशा प्रकारे होणारे विडंबन थांबवावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे. येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अलका नांदवे यांना ९ सप्टेंबर या दिवशी या मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘संबंधित पोलीस अधिकार्याला आम्ही योग्य ती समज देऊ. तुम्ही करत असलेली कृती चांगली आहे.’’
१. या निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशाचे मानवीकरण केले आहे. श्री गणेशाचे ही हिंदूंची प्रथम पूजनीय देवता असून, श्री गणेशाचे असे विडंबन केल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
२. विशेष पोलीस महानिरीक्षक (का.व सु.) श्री. गुलाबराव पोळ यांनी या संदर्भात परिपत्रक क्र. पोमस/२०/१९९/संकीर्ण/२४१/२००९ काढले होते. यानुसार राष्ट्रीय पुरुष, युगपुरुष, देवता इत्यादींची वेशभूषा केल्याने त्यांचा अनादर आणि अवमान होतो. ‘ही गोष्ट दखलपात्र आहे. तसेच यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा घटनांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे’, असे या परिपत्रकात म्हटले आहे. याची प्रतही या निवेदनासमवेत जोडण्यात आली.
३. हे परिपत्रक तसेच भारतीय घटनेचे कलम २९५ आणि ‘इंडियन ट्रेड प्रॅक्टिस अॅक्ट’ आदी गोष्टींचा विचार करून दोषी पोलीस अधिकार्यावर कारवाई करावी. वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीद्वारे होणारे विडंबन थांबण्यात यावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.
४. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार, श्री. अनिल नाईक, धर्मप्रेमी सर्वश्री विनोद पागधरे, किशोर राऊत आणि सचिन मातल उपस्थित होते.