पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी गणेशोत्सवाच्या सिद्धतेअंतर्गत केवळ कृत्रिम हौद आणि अमोनियम बायकार्बोनेट यांकडे लक्ष दिले; मात्र विसर्जन घाटांवर श्री गणेशमूर्तींचे नदीमध्ये विसर्जन करू इच्छिणार्या भाविकांसाठी अपेक्षित असणार्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केले. हे अयोग्य आहे.
पुणे : औंध येथील विसर्जन घाटावर ७ सप्टेंबर या दिवशी नदीकडे जाणारा रस्ता बांबू बांधून बंद करण्यात आला होता. त्यामुळे अनेक भाविकांना ‘नदीत विसर्जन करण्यास बंदी आहे’, असे वाटून नाईलाजास्तव कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागत होते. हे लक्षात आल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कर्मचार्यांना या अयोग्य प्रकाराची जाणीव करून देऊन त्यांचे प्रबोधन केले. त्यानंतर नागरिकांनीही आवाज उठवला. परिणामी पालिकेच्या कर्मचार्यांनी नदीकडे जातांना लावलेले बांबू हटवले. त्यामुळे वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करता आले.