नंदुरबार : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. नंदुरबार शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात हे उपक्रम राबवण्यात आले. विविध मंडळांमध्ये हिंदु राष्ट्र जागृती सभा, व्याख्याने, प्रवचने, फ्लेक्स प्रदर्शन या माध्यमांतून धर्मशिक्षण आणि साधनेचे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व सांगण्यात आले.
नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी आणि शहरातील नवी भोई गल्ली येथे हिंदु राष्ट्र जागृती सभांचे गणेशोत्सव मंडळांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या सभांना मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. रकासवाडे आणि नंदुरबार शहरातील गुरुकुल नगर १ या ठिकाणी ’हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचप्रमाणे वेडू गोविंद नगर आणि ज्ञानदीप सोसायटी या ठिकाणी’ आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले.
नवयुवक गणेशोत्सव मंडळ खोंडामळी, कन्या जन्माचे स्वागत गणेशोत्सव मंडळ, नवी भोई गल्ली हिंदकेसरी गणेश मित्र मंडळ गुरुकुलनगर, महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळ रकासरवाडे यांनीही वरील विविध उपक्रम राबवले.
नंदुरबार शहरातील विविध मंडळांनी फ्लेक्स प्रदर्शन लावले. त्यात ‘गणपतीविषयी शास्त्रीय माहिती, महान क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन, आरोग्य क्षेत्रातील दुष्प्रवृत्ती, अन्न पदार्थातील भेसळ’ या विषयावर प्रबोधन करण्यात आले. हस्तपत्रके, भित्तीपत्रके या माध्यमांतूनही जनजागृती करण्यात आली.