भांडुप (प) : गणेशोत्सवाच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या मुंबई आणि नवी मुंबई येथे विविध प्रबोधनपर उपक्रम घेण्यात आले. येथे बालशिवनेरी मित्र मंडळात क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन लावण्यात आले. पुष्कळ पाऊस असूनही कार्यकर्त्यांनी ‘आम्ही हे प्रदर्शन चालू ठेवू’, असे सांगितले. कोणतीही विज्ञापने न घेता हे प्रदर्शन चालू ठेवण्यात आले. अनेक जणांनी प्रदर्शनाची छायाचित्रे काढून व्हॉट्सअॅपद्वारे त्याचा प्रसार केला, तसेच उपक्रमाचे कौतुक केल्याचे मंडळाचे अध्यक्ष श्री. गणेश इथापे यांनी सांगितले.
ऐरोली येथील श्री सिद्धीविनायक मित्र मंडळ, सप्तशृंगी सोसायटी गणेशोत्सव मंडळ, तसेच अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ येथे ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ याविषयी भित्तीपत्रके लावण्यात आली. अष्टविनायक गणेशोत्सव मंडळातील उपस्थितांनी ‘शास्त्रानुसार गणेशोत्सव कसा करावा ?’ हेही जाणून घेतले. नेरूळ येथे ‘करावे गावचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात संपूर्ण अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण पाटील यांनी पुढाकार घेतला. स्वराज्य मित्र मंडळात ‘स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ याविषयी माहिती सांगून प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
वाशी येथे वर्धमान पॅलेस गणेश मंडळात ‘गणेश उपासना आणि साधना’ या विषयावर समितीचे वैद्य उदय धुरी यांनी मार्गदर्शन केले. येथे सात्त्विक उत्पादने, तसेच ग्रंथ प्रदर्शनही लावण्यात आले. प्रवचन ऐकून इमारतीमधून एक महिला बाहेर आल्या आणि त्यांनी इंग्रजी भाषेतील २-३ ग्रंथ खरेदी केले. तसेच प्रवचनात भाषेमुळे जे कळले नाही, ते त्यांनी विचारून घेतले.