गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव मंडळांना देण्यासाठी विशेष भेट संच सिद्ध करण्यात आले होते. या संचात सनातन पंचांग २०२०, सनातन निर्मित सात्त्विक उदबत्ती, कापूर, कुंकू, अष्टगंध, गोमूत्र अर्क, सात्त्विक वाती, लघुग्रंथ ‘श्री गणपति’, दैनिक सनातन प्रभातचा ‘कलाधिपती श्री गणेश’ हा विशेषांक यांचा समावेश होता. हे संच इंगळी, मांगूर, कुन्नुर, बारवाड शिरोली, हालोंडी, हेर्ले, चिखली, वरणगे, अशा गावांमधील एकूण १११ गणेशोत्सव मंडळांना भेट देण्यात आले. तसेच चिखली येथे ३ आणि वरणगे येथे १ धर्मप्रेमींना हे संच भेट देण्यात आले.
संच भेट देतांना गणेशोत्सव मंडळांचे प्रबोधन करण्यात आले. यात प्रवचनासह गणेशोत्सव आदर्श होण्यासाठी मंडळांची बैठक घेण्यात आली, तसेच सर्वांकडून श्री गणेशाचा नामजप करवून घेण्यात आला. अशा प्रकारचा संच भेट दिल्यानंतर बहुतांश मंडळांनी ‘ही आध्यात्मिक भेट आवडली. आम्हीही झोकून देऊन धर्मप्रसार करू’, असा अभिप्राय दिला.
भेट संच देण्यासाठी विविध धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा पुढाकार
१. मांगूर येथे बिरदेव मंदिरात जमलेल्या १४ गणेशोत्सव मंडळांना एकत्र करण्यात श्रीराम सेनेचे श्री. विठ्ठल बेळगे आणि श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. आनंदा आवटे यांनी पुढाकार घेतला. ‘यापुढे काही सहकार्य लागल्यास आम्ही करू’, अशी प्रतिक्रिया गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दिली.
२. कुन्नर येथे धर्मप्रेमी श्री. संतोष हुजरे आणि धर्मप्रेमी श्री. आशुतोष कणंगले यांनी भेटसंच देण्यासाठी पुढाकार घेतला. ‘काळानुसार तुमचे उपक्रम आवश्यक आहेत’, अशी प्रतिक्रिया एका मंडळाने व्यक्त केली, तसेच एका मंडळाने स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्याची मागणी केली.
३. बारवाड येथे श्री. सुभाष पाटील आणि श्री. बाळासाहेब पाटील या धर्मप्रेमींनी भेट संच देण्यासाठी पुढाकार घेतला. या वेळी सरपंच श्री. कृष्णात पाटील यांनी ‘हे उपक्रम सर्वत्र होणे आवश्यक असून समाजोपयोगी आहेत’, असे सांगितले.
४. इंगळी येथे १४ मंडळांना एकत्र करून हे संच देण्यात आले. याचे नियोजन शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य श्री. उमेश शिंदे यांनी केले. शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते श्री. नितीन जैन यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
५. शिरोली येथे शिवसेना ग्राहक संरक्षण समितीचे तालुका समन्वयक श्री. दीपक यादव, हालोंडी येथे धर्मप्रेमी श्री. सचिन कोळी, हेर्ले येथे शिवसेनेचे उपसरपंच श्री. विजय भोसले यांनी भेट देण्यात पुढाकार घेतला. श्री. विजय भोसले यांनी ‘नवरात्रात प्रवचन आयोजित करू’, तसेच सनातनचे सात्त्विक कुंकू प्रायोजित करण्याच्या संदर्भात आवाहन केले. हालोंडी आणि शिरोली येथे उद्योजक श्री. आनंद पाटील यांनी प्रोजेक्टरद्वारे विषय मांडून श्री गणेशाचा नामजप कसा करायचा, याविषयी सांगितले.
६. वरगणे येथे धर्मप्रेमी यांनी श्री. विजय पाटील, तर केर्ले येथे धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे यांनी हे संच देण्यासाठी पुढाकार घेतला. येथे धर्मशिक्षण वर्गाची मागणी करण्यात आली.