Menu Close

धर्मशास्त्र समजल्याने बहुसंख्य हिंदूंनी श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य यांचे वहात्या पाण्यात केले विसर्जन

चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशास्त्र प्रबोधन मोहीमेस चांगले यश

बहादूरशेखनाक्या नजिकच्या विसर्जनस्थळी फलकाद्वारे प्रबोधन करतांना समितीचे कार्यकर्ते

चिपळूण, १४ सप्टेंबर (वार्ता.) – वर्षातून एकदाच होणार्‍या गणेशोत्सवामुळे प्रदूषण होते, असा कांगावा करत तथाकथित पर्यावरणवादी श्री गणेशमूर्तींच्या वहात्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध करतात, तसेच अनेक ठिकाणी बलपूर्वक श्री गणेशमूर्तींचे दान करण्यास, तसेच कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास गणेशभक्तांना भाग पाडले जाते. याविषयी गेली काही वर्षे चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीसह निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयी सातत्यपूर्ण प्रबोधन करत आहे. यावर्षीही चिपळूण येथील बहादूरशेखनाक्या नजिकच्या वाशिष्टी नदीच्या काठी आणि बाजारपेठेतील नाईक कंपनी पुलानजीकच्या विसर्जन स्थळांवर समितीच्या वतीने श्री गणेशमूर्ती अन् निर्माल्य विसर्जनासंबंधी धर्मशास्त्र प्रबोधन मोहीम घेण्यात आली. या मोहिमेला हिंदु बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन श्री गणेशमूर्तींसह निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जन करून श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची स्तुत्य कृती केली. एकूणच हिंदु जनजागृती समितीच्या या मोहिमेला समाजातून चांगले यश मिळाले.

चिपळूण नगरपालिकेकडून धर्मशास्त्रविरोधी कृत्रिम तलावाची निर्मिती

नदीचे पाणी दुथडी भरून वहात असतांना प्रशासनाने कृत्रिम तलाव निर्माण करावा, हे हास्यास्पद ! – गणेशभक्तांच्या प्रतिक्रिया

चिपळूण येथील विसर्जन स्थळावर यावर्षी प्रथमच श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती. वाशिष्टी नदीचे पाणी दुथडी भरून वहात असतांना प्रशासनाने कृत्रिम तलाव निर्माण करावा, हे हास्यास्पद आहे. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाजातून व्यक्त केल्या जात होत्या. एकही मूर्ती या तलावात विसर्जित केली गेली नाही. त्यामुळे त्याच्या निर्माणासाठी केलेला खर्च अक्षरश: वाया गेला. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार हे तलाव निर्माण केले गेले, असे काही सूत्रांकडून समजले. (श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नदीमध्ये मुबलक पाणी असतांनाही कृत्रिम तलाव बांधण्यास सांगणार्‍यांकडूनच तलावाचा झालेला खर्च घ्यायला हवा, असे गणेशभक्तांना वाटले, तर त्यात काय चुकीचे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित करण्याच्या धार्मिक अधिकाराचे निर्भयपणे पालन करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हिंदु बांधवांचे केले प्रबोधन

काही हिंदु बांधव पालिका कर्मचारी निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित करण्यास विरोध करत आहेत, असे सांगत होते. ते निर्माल्य कुंडीत टाकण्यासाठी येत असतांना समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निर्माल्य कुंडीतच टाकायला हवे, अशी प्रशासन बळजोरी करू शकत नाही, याची जाणीव करून दिली. घटनेनुसार आपल्याला धर्मशास्त्र पालनाचे अधिकार असून निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जन करून निर्भयपणे धर्मशास्त्राचे पालन करा, असे कार्यकर्त्यांनी सांगितल्यावर हिंदु बांधवही तशी कृती करत होते; मात्र ते करत असतांना त्यातील जलप्रदुषणास करणीभूत असलेले घटक बाजूला करून ते कुंडी टाकण्याविषयीचे प्रबोधनही समितीच्या कार्यकर्त्यांनी केले.

समाजातून हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधन मोहिमेविषयी कौतुक

हिंदु जनजागृती समितीमुळे आज धर्मशास्त्राचे महत्त्व समजत असून, आमच्या हातून शास्त्रविरोधी कृती होण्याचे टळत आहे. आज सर्वत्र पर्यावरणविषयी जे सांगितले त्याचा परिणाम समाजमनावर होतो. काय योग्य आणि काय अयोग्य हे समजेनासे होते. अशा वेळी धार्मिक गोष्टींविषयी समिती करत असलेल्या मोहिमेचा आधार वाटतो, अशा स्वरूपाचे अभिप्राय हिंदूंकडून व्यक्त केले जात आहेत. त्यांनी समितीच्या प्रबोधन मोहिमेचे कौतुक केले.

या मोहिमेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे, श्री. विनायक कांगणे, श्री. विश्‍वनाथ पवार, डॉ. हेमंत चाळके, श्री. सौरभ खरे, अधि.(सौ.) श्रेया कदम, तसेच सनातन संस्थेचे श्री. ज्ञानदेव पाटील, श्री. केशव अष्टेकर, श्री. प्रल्हाद बांदेकर, सौ. सोनाली पवार, सौ. बिराजदार आदींनी सहभाग घेतला. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीविसर्जन आणि निर्माल्य विसर्जनाचे फ्लेक्स फलक हाती धरून प्रबोधन केले.

समाजातील काही प्रतिक्रिया :

१. श्री. रविराज आवले, खेंड, चिपळूण

विसर्जन स्थळावर ठेवलेले निर्माल्य कलश पाहून पालिका अधिकार्‍यांना मी विचारले, ‘येथे नदीत मटण, मच्छीच्या दुकानातील मांस, पाणी, तसेच सांडपाणी नदी पात्रात जात आहे. याने प्रदूषण होत नाही का ? हिंदूंच्या सणाला प्रदूषणाचा मुद्दा काढला जातो; मात्र खरे प्रदूषण करणार्‍या गोष्टींकडे दुलर्क्ष केले जाते.

२. श्री. सुनील जागुष्टे, महालक्ष्मी रेसिन्डेंसी, खेंड, चिपळूण : मूर्तीसह निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जन करण्याची आमची शेकडो वर्षांची परंपरा आहे. याने प्रदूषण होत नाही, केवळ हिंदूंच्याच सणांना प्रदूषणाचा विषय निघतो.

क्षणचित्रे

१. पालिकेने ठेवलेले निर्माल्य कलश आणि कुंड्या रिकाम्या स्थितीत होत्या. कुणीही त्यात निर्माल्य टाकले नाही.

२. एका संप्रदायाकडून निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम केला जात होता; मात्र हिंदु बांधवांनी त्यांना प्रतिसाद न देता निर्माल्य मूर्तीसमवेतच विसर्जित करण्याला प्राधान्य दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *