-
महापालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात प्रचार केलेल्या धर्मशास्त्रविरोधी पर्यायांकडे भाविकांची पाठ
-
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक !
-
प्रबोधन मोहीम यशस्वी !
पुणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी ‘आदर्श गणेशोत्सव’ मोहिमेच्या अंतर्गत पुणे शहर, तसेच पिंपरी-चिंचवड भागांतील विसर्जन घाटांवर प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. समितीचे कार्यकर्ते ‘गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करा’, असे आवाहन करणारे फलक धरून उभे होते. प्रबोधनाला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महापालिका प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद आणि अमोनियम बायकार्बोनेट या धर्मशास्त्रविरोधी पर्यायांचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला होता. कृत्रिम हौदांच्या ठिकाणी भाविकांसाठी पटलांची व्यवस्था करण्यात आली होती, तितक्या प्रमाणात नदीच्या घाटांवर करण्यात आली नव्हती. सकाळ, स्पंदन, कमिन्स इंडिया, अभाविप यांच्याकडून निर्माल्य गोळा करण्यासाठी आणि हौदात विसर्जन करण्यासाठी प्रबोधन करण्यात येत होते; मात्र तरीही बहुतांश गणेशभक्तांनी परंपरेप्रमाणे नदीच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले. गणरायाच्या कृपेने पाऊस चांगला पडल्याने नदीला पाणीही सोडण्यात आले होते.
नदीकडे जाणारा रस्ता पटल लावून बंद केल्याविषयी समितीच्या कार्यकर्त्यांनी खडसावल्यावर रस्ता मोकळा केला
वृद्धेश्वर घाटावर नदीकडे जाणारा मार्ग पटले लावून बंद करण्यात आला होता. समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याविषयी महापालिका कर्मचार्यांकडे विचारणा केल्यावर त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची दिली. ‘श्री गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन करणे, हा आमचा धार्मिक अधिकार आहे’, असे सांगितल्यावर कर्मचार्यांनी पटल थोडे बाजूला सरकावून नदीकडे जाण्यासाठी वाट करून दिली. त्यानंतर तेथे उपस्थित अन्य भाविकांनीही नदीकडे जाणार्या मार्गातील पटलांचे अडथळे काढून टाकण्याविषयी आवाज उठवला. भाविकांचा दबाव वाढल्यावर नदीकडे जाणारा तो मार्ग मोकळा झाला. त्यानंतर भाविकांचा नदीत विसर्जन करण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढला.
महापालिका साहाय्यक आयुक्त क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत एकूण २ लाख ५९ सहस्र ४०६ श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौद अथवा टाकी यांमध्ये, तर पारंपरिक पद्धतीने विसर्जन घाट, नदीपात्र आदी ठिकाणी २ लाख ७० सहस्र ७०३ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. महापालिकेच्या वतीने मूर्तीदान स्वीकारले जात होते. या अंतर्गत ४ सहस्र २९ मूर्ती जमा झाल्या. यावरून धर्मशास्त्रविसंगत पर्याय नागरिकांवर थोपवण्याचा प्रयत्न केला, तरी अजूनही निम्म्याहून अधिक भाविकांचे मत धर्मशास्त्रपूरकच आहे, हे दिसून येते.
प्रबोधन मोहिमेची काही क्षणचित्रे
१. ‘गणेशमूर्तीचे नदीत प्रदूषण केले, तर प्रदूषण होईल’, या विचाराने काही युवक गणेशमूर्तीचे हौदात विसर्जन करत होते; मात्र त्यांचे प्रबोधन केल्यावर त्यांनी गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन केले.
२. भिडे पूल येथे प्रबोधन मोहीम राबवत असतांना अक्रम खान या व्यक्तीने मोहिमेविषयी जाणून घेतले आणि ‘किमतीचा विचार न करता शाडू मातीच्याच गणेशमूर्ती घ्याव्यात’, असे मत प्रदर्शित केले.
३. एका यु-ट्यूब चॅनेलने भिडे पुलावर समितीचे श्री. पराग गोखले यांची मोहिमेविषयी मुलाखत घेतली.
४. व्होडाफोन आस्थापनाच्या वतीने विसर्जन घाटांवर श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी लोखंडी टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
मंदिर देवस्थान समितीकडूनच श्री गणेशाचे विडंबन
वृद्धेश्वर घाटावर ‘श्री सिद्धेश्वर वृद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने एका फ्लेक्सद्वारे श्री गणेश हेल्मेट घालण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते. ‘प्रत्येकाला माझ्याप्रमाणे पर्यायी डोके मिळेलच, असे नाही; म्हणून हेल्मेटचा उपयोग करा’, असे वाक्य त्यावर लिहिण्यात आले होते.