Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यात प्रवचने आणि नामसंकीर्तन मोहीम

ठाणे :  जिल्ह्यात श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवचने आणि नामसंकीर्तन मोहीम राबवण्यात आली. या वेळी ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ यासह विविध आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच रामनामाचा जप करण्यात आला. कल्याण येथील दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. अजय भारंबे, वाचक आणि धर्माभिमानी श्री. गिरीश धोकीया यांच्या घरी, वैश्य समाज गणेशोत्सव मंडळ येथे, तसेच दीनदयाल हिंदी शाळेतील शिक्षकांसाठी वरील उपक्रम राबवण्यात आले. यासह डोंबिवली (पश्‍चिम) आणि ठाणे येथेही प्रवचने घेण्यात आली.

रघुवीरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य कार्यक्रम !

डोंबिवली (पूर्व) येथील डॉ.  रघुवीरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ६० वे वर्ष आहे. या मंडळामध्ये यावर्षी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सादर केलेला ‘शिवकल्याण राजा’ हा कार्यक्रम झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उपस्थितांच्या अधिक जवळून लक्षात आला.  कु. राधा मंगेशकर यांनी ‘शिवकल्याण राजा’ मधील सुमधुर गाणी गायली. येथे गणेश यागही पार पडला. या गणेश यागामुळे वातावरणामध्ये सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होऊन वातावरण चैतन्यमय झाले होते. या मंडळात सनातनचे धर्मशिक्षण देणारे फलक आणि  ग्रंथप्रदर्शनही लावले जाते. या मंडळात ध्वनिक्षेपण यंत्रणेचा आवाज मर्यादित ठेवला जाऊन आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येते. तसेच केवळ भक्तीगीते आणि राष्ट्रप्रेम जागवणारी गीते लावण्यात येतात. मंडळाच्या वतीने वर्षभरामध्ये काही सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात.

दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. विनोद पडीयार हे मुलुंड येथील तरुण मित्र मंडळाचे सल्लागार आहेत. त्यांनी तसेच मंडळाचे अध्यक्ष गणेश लांडगे यांनी गणेशोत्सवाच्या काळात  जे लोक अर्पण देतात, त्यांना पावतीसह सनातनचा एक लघुग्रंथ भेट दिला. त्यांनी १०० ‘अथर्वशीर्ष’ आणि ३१ ‘देवीपूजनामागील शास्त्र’ असे एकूण १३१ लघुग्रंथ भेट देऊन गणेशोत्सवात एक स्तुत्य उपक्रम राबवला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *