हुपरी (जिल्हा कोल्हापूर) : गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांनी विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती पंचगंगा नदीच्या काठावर बाहेर आल्या होत्या. पात्राच्या बाहेर आलेल्या १३० पेक्षा अधिक मूर्ती क्रांतीवीर राजगुरुनगर येथील त्रिमूर्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते, तसेच अन्य धर्मप्रेमी यांनी पुढाकार घेऊन नदीत परत विसर्जित केल्या. मोठ्या प्रमाणात चिखल, तसेच अडचणी यांतून केलेल्या या कृतीसाठी धर्मप्रेमींचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. या उपक्रमात सर्वश्री शुभम दैने, दिग्विजय म्हैतर, सयाजी देसाई, शिवराज जावध यांसह अन्य सहभागी झाले होते.
या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळाला प्रबोधनासाठी महाराष्ट्र शासनाने गौरवलेले आहे. हे मंडळ सजीव देखावा करण्यात पुढाकार घेते. मंडळाने सामूहिक आरती, खुल्या मैदानात प्रेक्षकांमध्ये देखावा, टाळ-मृदंगाच्या गजरात आगमन आणि विसर्जन, रक्तदान करणे, दुष्काळग्रस्त, तसेच पूरग्रस्तांना सहकार्य करणे, हिंदु जनजागृती समितीच्या व्याख्यानांचे आयोजन करणे अशा कृती केल्या आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात