विविध हिंदुत्वनिष्ठांच्या प्रबोधनाला मोठे यश !
बारामती (जिल्हा पुणे) : या वर्षी येथील नगरपालिकेने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी ‘विसर्जनाच्या वेळी श्री गणेशमूर्ती स्वीकारायच्या नाहीत’, असा निर्णय घेतला होता, तसेच ‘निर्माल्य देण्यासाठी कोणावरही बळजोरी करू नये’, असेही पालिकेने स्पष्ट केले होते. त्यामुळे यंदा येथील १०० टक्के नागरिकांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जनच केले. (धर्मरक्षणासाठीचा बारामतीचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा ! – संपादक)
प्रारंभी नगरपालिकेने कर्मचार्यांना आदेश काढून नागरिकांना कृत्रिम कुंडामध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन करण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र याविषयी नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी नगरसेवक सुनील सस्ते, अधिवक्ता भार्गव पाटसकर, अधिवक्ता नीलेश वाबळे, नीलेश धालपे यांनी नगरपालिका अधिकार्यांची भेट घेतली. त्यानंतर पालिकेने स्वत:ची भूमिका पालटून श्री गणेशमूर्ती दान न घेता केवळ निर्माल्य हौदात टाकण्याचे आवाहन करावे, कोणावरही बळजोरी करू नये, असा आदेशामध्ये पालट केला.
मागील अनेक वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहीम राबवण्यात येत आहे, तसेच त्याविषयी प्रशासनाला निवेदनही दिले जाते. या वर्षीही हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी तीन हत्ती चौक येथील नीरा डावा कालवा या ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहीम राबवली. मागील वर्षी नगर परिषद आणि ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या वतीने मूर्तीदान उपक्रम राबवण्यात आला होता. त्यानंतर जमा झालेल्या श्री गणेशमूर्ती कचरा वहाणार्या वाहनातून नेऊन त्या कचरा डेपोच्या परिसरामध्ये खड्डा करून पुरण्याचा प्रयत्न केला होता. या विटंबनेच्या प्रकरणानंतर भाजपचे प्रशांत सातव, नगरसेवक सुनील सस्ते, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नीलेश धालपे आणि त्यांचे अन्य सहकारी यांनी ‘संबंधित अधिकारी अन् सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी’, या मागणी केली होती, तसेच एक दिवस ‘बारामती बंद’चेही आवाहन करण्यात आले होते. धर्माभिमानी हिंदूंच्या या जागरूकतेमुळे या वर्षी पालिकेने श्री गणेशमूर्ती दान घेतल्या नाहीत.