हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे म्हैसुरू (कर्नाटक) येथील पोलीस उपायुक्तांना निवेदन
म्हैसुरू (कर्नाटक) : कर्नाटक राज्यात झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांची प्रकरणे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (एन्.आय.ए.कडे) सोपवण्यात यावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने येथील पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. गुरुप्रसाद गौडा यांच्यासमवेत अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार असतांना १९ फेब्रुवारी २०१५ ते ३ जानेवारी २०१८ या ३ वर्षांत अनुमाने २४ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या अमानुषपणे हत्या करण्यात आल्या. या हत्याकांडामागे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या धर्मांध आतंकवादी संघटनेचा हात असल्याचे सर्व प्रकरणांच्या आरोपपत्रातून लक्षात आले आहे. तसेच ‘या सर्व हत्या दक्षिण भारतात इस्लामिक राज्य आणण्यासाठी पी.एफ्.आय. करत आहे’, असे हिंदुत्वनिष्ठ रुद्रेश यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने म्हटले आहे. त्यामुळे अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांच्या सर्व प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या वतीने करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांनी केली.