नाशिक : अयोध्या येथील राममंदिराच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. आपल्या सर्वांचा सर्वोच्च न्यायालय, राज्यघटना, न्याय प्रक्रिया यांवर विश्वास असला पाहिजे. देशातील सर्व नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून राममंदिरासंबंधी वक्तव्ये केली जात आहेत. अशी वक्तव्ये करणार्यांना मी हात जोडून विनंती करतो. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतांना वक्तव्य करणारे कुठून येत आहेत ? सर्व प्रकरणात अडथळा का आणला जात आहे ?, असे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे उपस्थित केले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’चा समारोप १९ सप्टेंबरला नाशिकमध्ये पंचवटीतील तपोवन येथे झाला. या समारोप सोहळ्यात पंतप्रधान बोलत होते.
या वेळी पंतप्रधान म्हणाले की,
१. शरद पवार यांनी विरोधक म्हणून आमच्यावर टीका करावी; पण हे अनुभवी नेते मतांसाठी राष्ट्रहिताच्या विरोधात वक्तव्ये करतात, हे दुर्दैवी आहे. शरद पवार यांना शेजारचा देश चांगला वाटतो, ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात, हे त्यांचे आकलन; पण ‘आतंकवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ?, झुंड आणि शोषण झाल्याची छायाचित्रे कुठून येतात ?’, हे संपूर्ण विश्व जाणते.
२. राजकीय अस्थिरतेमुळे गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसली होती; पण गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रात चांगली गुंतवणूक झाली, शेतकरी, महिला यांचा विकास झाला. भटक्या विमुक्त जाती, मागासवर्गीय जनतेला सरकारच्या रूपात नेतृत्व मिळाले. पूर्ण बहुमत नसतांनाही महाराष्ट्रात प्रगतीशील सरकार भाजपच्या रूपात मिळाले. हे केवळ फडणवीस सरकारचे ‘रिपोर्ट कार्ड’ नाही; तर जनतेने स्थिर सरकारचे लाभ लक्षात घ्यायला हवेत.
नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त भाजपचे नेते नाशिकमध्ये उपस्थित होते. या वेळी मोदी यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्याचे आवाहन केले. या सभेत कांदा वा अन्य शेतमालाशी संबंधित वस्तू, पिशव्या आणण्यास बंदी घालण्यात आली होती. परिसरातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केल्याविषयी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. गेली ५ वर्षे आम्ही प्रामाणिकपणे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज या राज्याच्या दैवताला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विसरले म्हणून ते घरी बसले. ‘महाराष्ट्र गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचारी आणि दलाल यांचा अड्डा झाला’, असे पंतप्रधानांनी सांगितले आणि हे सर्व समाप्त करण्याचे काम त्यांनी मला दिले.’’
भाजपच्या खासदार पंकजा मुंडे-पालवे यांनीही या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर परखड भाषेत टीका केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात