अनेक वर्षांचे पिंपळाचे झाडही तोडले
विकासाच्या नावाखाली मंदिर हटवण्यात आले असले, तरी कारवाई करण्यापूर्वी अन्य ठिकाणी मंदिर उभारणे आणि तेथे मूर्तीची प्रतिष्ठापना करणे आवश्यक होते. रेल्वेस्थानक परिसरात अन्य पंथियांचे प्रार्थनास्थळही आहे. त्याचाही प्रवाशांना त्रास होतो; मात्र त्याला प्रशासन हात लावत नाही, हे लक्षात घ्या !
पुणे : रेल्वेस्थानकाच्या आवारात असलेले सूर्यमुखी दत्तमंदिर पाडण्यात आले, तसेच मंदिराजवळ अनेक वर्षांपासून असलेले पिंपळाचे झाड रेल्वे प्रशासनाकडून १५ सप्टेंबर या दिवशी तोडण्यात आले. साधारण ४० वर्षांपूर्वी रेल्वेस्थानक परिसरात मंदिराची उभारणी करण्यात आली होती. या परिसरात पिंपळाची चार मोठी झाडे होती. रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तेथील पुनर्विकास चालू करण्यात आला. यासाठी तीन झाडे काही मासांपूर्वीच तोडण्यात आली होती.
१५ सप्टेंबर या दिवशी चौथे झाड आणि दत्तमंदिर हटवण्यात आले. त्या ठिकाणी प्रवाशांसाठी ‘शेड’ उभारण्यात येणार आहे. ‘पिंपळाच्या झाडाचे खोड आणि मुळे यांमुळे परिसरातील लाद्या (फरशा) उखडल्या होत्या. त्याचा प्रवाशांनाही त्रास होत होता. त्यामुळे ते झाड हटवणे आवश्यक होते; मात्र झाडाखालील मंदिर हटवल्याविना झाड काढणे शक्य नव्हते. मंदिराची देखभाल करणार्या लोकांनी होकार दिल्यानंतरच मंदिर हटवण्यात आले, तसेच पिंपळाच्या झाडाचे मालधक्का परिसरातील रेल्वेच्या जागेत पुनर्रोपण करण्यात आले’, असे रेल्वेच्या अधिकार्यांनी सांगितले.
‘गेल्या ६ मासांपासून ही झाडे काढण्याचा प्रयत्न चालू होता. या कालावधीत अन्यत्र मंदिर उभारून झाले असते आणि आताचे मंदिर पाडण्यापूर्वी तेथील मूर्ती नवीन मंदिरात विधीवत् ठेवता आली असती; पण रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले’, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी गटाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात