अंनिसचे ‘प्रशिक्षित’ शिक्षक विद्यार्थ्यांना देणार (अंध)श्रद्धा निर्मूलनाचे प्रशिक्षण !
अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंचे श्रद्धाभंजन करणार्या अंनिसकडून प्रशिक्षण घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण दिल्यास खर्या अर्थाने अंधश्रद्धांचे निर्मूलन होईल आणि ते नीतीवान बनतील !
मुंबई : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांद्वारे महापालिकेच्या इयत्ता ४ थी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रशिक्षण देण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यानुसार वॉर्ड आणि विभाग स्तरांवरील विद्यार्थ्यांना याविषयीचे मार्गदर्शन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
१. जुलै २०१५ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन नगरसेविका वंदना साबळे यांनी ही मागणी केली होती. या मागणीमध्ये साबळे यांनी मुंबईसारख्या प्रगतीशील शहरात अंधश्रद्धेमुळे निर्माण होणार्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा दावा करत मांजर आडवी जाणे, अंगावर पाल पडणे, अंगात येणे, जादूटोणा अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांचे प्रमाण जनसामान्यांमध्ये वाढत असल्याचे सांगितले होते. समाजातील या अंधश्रद्धांमुळे लहान मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असून अशा प्रकारचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते.
२. यानुसार ६ सप्टेंबर २०१९ या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षकांना अंनिसच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले. याविषयी शिक्षणाधिकारी महेश पालकर म्हणाले, ‘‘या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध माहिती मिळून विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धांचे निर्मूलन होईल, तसेच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत सकारात्मक पालट होईल.’’ (शारीरिक आणि मानसिक स्थिती सकारात्मक रहाण्यासाठी विद्यार्थ्यांना साधना शिकवणे आवश्यक आहे, हे शिक्षणाधिकार्यांनी जाणावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली श्रद्धेवर घाला घालणार्या अंनिसची पार्श्वभूमी
यापूर्वी अंनिसच्या वतीने राज्यातील प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी राबवलेल्या ‘वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प’ या उपक्रमाच्या अंतर्गत प्रश्नपत्रिकेमध्ये ‘संत तुकाराम महाराज यांच्या नावावर कोणकोणते चमत्कार खपवले जातात ?’, ‘शनिशिंगणापूरला चोर्या होत नाहीत, ही अंधश्रद्धा कशी तपासावी ?’, ‘वेदांसंबंधी अंधश्रद्धा कोणत्या ?’, ‘उपवासाचे शारीरिक दुष्परिणाम कोणते ?’ ‘सत्यनारायण कथेमध्ये कोणकोणते चमत्कार सांगितले आहेत ?’, ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, हे विधान कोणाचे आहे ?, अशा प्रकारचे हिंदु धर्माविषयी संभ्रम निर्माण करणारे प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच या प्रकल्पाच्या अंतर्गत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी महाविद्यालयात अंनिसच्या कार्यकर्त्यांनी हिंदु धर्म, देवता, संत आणि राष्ट्रपती यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केल्यामुळे १८ जुलै २००७ या दिवशी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात अंनिसच्या ४ कार्यकर्त्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला.
अशा उपक्रमांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली अंनिस विद्यार्थ्यांच्या मनातील हिंदु धर्माविषयी असलेल्या श्रद्धेचे कशा प्रकारे भंजन करत आहे, हे लक्षात येते. त्यामुळे अंनिसचा हा कावेबाजपणा ओळखून समस्त हिंदु धर्मप्रेमींनी अंनिसचे असे कार्यक्रम रोखण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करावेत !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात