हिंदु युवकांनी आपला धर्म आणि परंपरा यांचा अभ्यास करायला हवा ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
कुडाळ : आज पाश्चिमात्य देशांत हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा स्वीकार केला जात आहे; मात्र भारतियांवर ब्रिटिशांच्या मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीचा पगडा दृढ झाल्याने, ते हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांना बुरसटलेले मानू लागले आहेत. हा हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा परिणाम आहे. हिंदु युवकांनी आपला धर्म आणि परंपरा यांचा अभ्यास करायला हवा. त्यांचा अभिमान बाळगायला हवा, अन्यथा पिकते तेथे विकत नाही, याप्रमाणे आपली स्थिती होईल. असे होऊ नये, यासाठी हिंदु जनजागृती समिती धर्मजागृती, धर्मशिक्षण, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूसंघटन या पंचसुत्रीवर कार्य करत आहे. युवा पिढीने समितीच्या या व्यापक कार्याचा अभ्यास करून राष्ट्र आणि धर्मरक्षण यांसाठी सक्रीय व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साळगाव येथील सावित्री लीला मंगल कार्यालयात नुकतेच जिल्हास्तरीय युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. खाडये यांनी उपस्थित युवावर्गाला मार्गदर्शन केले. या वेळी सनातनचे संत सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती.
श्री. खाडये पुढे म्हणाले, अमेरिकेसारख्या देशांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून त्यांच्या संसदेचे कामकाज चालू होण्यापूर्वी वेदमंत्रपठण करण्यास प्रारंभ केला; मात्र भारतातील तथाकथित बुद्धीवादी वेद, ईश्वर वगैरे कालबाह्य झाले, असे सांगत भारतियांचा बुद्धीभेद करत आहेत. परिणामी देशात बहुसंख्येने असलेले हिंदू नास्तिक होत चालले आहेत. त्यामुळे देव, देश, धर्म, आपली श्रद्धास्थाने यांच्याविषयी विडंबन झाल्यास त्यांना त्याचे काहीच वाटेनासे झाले आहे. त्यामुळेच आज हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करण्याचे प्रमाण वाढत आहे. समितीने एका प्रकरणांत उठवलेल्या प्रखर आवाजामुळे अॅमेझॉनसारख्या विदेशी आस्थापनाला भारताची जाहीर क्षमा मागावी लागली.
या वेळी सनातनचे डॉ. संजय सामंत यांनी विज्ञान आणि अध्यात्म, यांविषयी मार्गदर्शन केले. अधिवक्ता सौ. कावेरी राणे यांनी कलियुगात साधना कशी आणि कोणत्या मार्गाने करावी, साधनेत तात्त्विक भागापेक्षा प्रायोगिक भाग म्हणजे कृतीला कसे महत्त्व आहे, हे विशद् केले. सद्गुरु सत्यवान कदम यांनी राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी, तर सौ. ज्योत्स्ना नारकर यांनी स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व आणि त्याचे विविध टप्पे याविषयी मार्गदर्शन केले.
सायंकाळी झालेल्या गटचर्चेच्या सत्रात शिबिरार्थींनी धर्मकार्यात सहभाग कसा घेऊ शकतो, याविषयी सांगितले. शिबिरार्थींनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविषयीही सविस्तरपणे जाणून घेत, त्यासाठी कृतीप्रवण होण्यासाठी सिद्धता दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा धुरी यांनी केले. या शिबिरात जिल्ह्यातील सुमारे १०० युवक-युवती सहभागी झाले होते.