सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी घेतली ‘हिमालिनी टीव्ही’च्या संपादिकेची भेट !
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील एकमेव हिंदी मासिक आणि यु ट्यूब वाहिनी ‘हिमालिनी’च्या संपादिका डॉ. श्वेता दीप्ती आणि प्रबंध संचालक श्री. सच्चिदानंद मिश्र यांची भेट घेतली. या वेळी डॉ. श्वेता यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्याशी संवाद साधला. गोव्यातील अष्टम् अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनाला ‘हिमालिनी टीव्ही’ ने त्याच्या यु ट्यूब वाहिनीवर प्रसिद्धी दिली होती.
आपल्या देशाला कोणत्या दिशेने न्यायचेे, याचा विचार आजच्या युवा पिढीने केला पाहिजे !
सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचे ‘काठमांडू शिक्षा कॅम्पस’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सध्याची शिक्षण व्यवस्था आपल्याला विविध विषय शिकवते; परंतु जीवनाचा उद्देश म्हणजेच आनंदप्राप्ती कशी करावी, जीवनात येणार्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना कसा करावा, हे शिकवत नाही. सनातन धर्मावर आधारित पूर्वीच्या गुरुकुल परंपरेमध्ये विद्यार्थ्यांना जीवनातील अध्यात्माचे महत्त्व शिकवल्यामुळे त्यांचे जीवन आनंदी असायचे. आज विज्ञानामुळे आपण अध्यात्मापासून लांब गेलो आहोत. केवळ शिक्षण घेतल्याने मनुष्य सुखी होतो, असे नाही. आज समाजात अनेक सुशिक्षित आणि अतीशिक्षित लोक आहेत; पण त्यांच्याकडे नोकरी नसल्याने ते दु:खी आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, तेही दु:खी आहेत. अमेरिका आणि युरोपमधील देश यांनी वैज्ञानिक प्रगती केली. पैशाची मुबलकता आहे; पण तेथे सर्वाधिक मानसिक आजार अन् व्यसनाधिनता आहे, तसेच तेथे मुलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार इत्यादी गुन्हेही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. व्यक्ती सुखी झाली की कुटुंब आणि नंतर समाज सुखी करण्याचे प्रयत्न केले, तर राष्ट्र निर्माण होते. त्यामुळे आपल्या देशाला कोणत्या दिशेने न्यायचे आहे, याचा विचार आजच्या युवा पिढीने केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील ‘काठमांडू शिक्षा कॅम्पास’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले. या निमित्ताने कॅम्पसचे संस्थापक सदस्य तथा राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे अध्यक्ष प्रा. डॉ. माधव भट्टराई यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचा सन्मान केला. याप्रसंगी नेपाळच्या माजी राज्यमंत्री सौ. कांता भट्टराई, कॅम्पसचे व्यवस्थापक श्री. गुप्ता आदी उपस्थित होते.
‘नवचेतना न्यूज पोर्टल’चे संपादक कर्ण प्रकाश धिताल आणि प्रकाशक प्रभात राज पाण्डेय यांची भेट
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘नवचेतना न्यूज पोर्टल’चे संपादक श्री. कर्ण प्रकाश धिताल आणि प्रकाशक श्री. प्रभात राज पाण्डेय यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य जाणून घेतले. श्री. धिताल यांनी त्यांच्या पोर्टलवर हिंदु जनजागृती समितीचे धर्मशास्त्रावरील लेख नियमितपणे प्रकाशित करण्याची सिद्धता दर्शवली.
ईश्वराचा आशीर्वाद आणि धर्माच्या बाजूने असलेल्यांचाच विजय होतो !
सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाकांची विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा !
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेतृत्व करतांना येणार्या मर्यादा, अडचणी आणि उपाययोजना यांविषयी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले,
१. हिंदुत्वाचे कार्य करतांना कार्यकर्त्यांना थोडेफार कर्मकांडाचे ज्ञान असते; पण धर्माचे नसते. आपण धर्माच्या विविध अंगांचा अभ्यास केला, तर आपल्याला अयोग्य गोष्टींचे खंडन करता येऊ शकते.
२. आपण केवळ संख्याबळ आणि बाहुबळ यांच्या मागे जातो. संख्याबळ तर कौरवांकडेही होते; परंतु श्रीकृष्ण समवेत असलेले पांडव जिंकले. संख्याबळ आणि वेदांचे ज्ञान रावणाकडे होते; परंतु श्रीराम जिंकले. यातूनच स्पष्ट होते की, ईश्वराचा आशीर्वाद आणि धर्माच्या बाजूने असलेल्यांचाच विजय होतो. त्यामुळे कार्याला ईश्वरी अधिष्ठान असणे महत्त्वाचे आहे.
३. नेतृत्व योग्य असेल, तर त्यामागे समाज येतो. जेव्हा आपण दुसर्याचे अस्तित्व स्वीकारतो, तेव्हा समोरचाही आपले अस्तित्व स्वीकारतो. दुसर्या संघटनेसमवेत कार्य करतांना आपली संघटना संपणार नाही, याची खात्री अन्य संघटनांना झाली की संघटनांचे संघटन शक्य होते.
या वेळी राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीचे प्रशिक्षण सदस्य सचिव आणि ब्राह्मण समाज नेपाळचे केंद्रीय उपाध्यक्ष रामानंद न्यौपाने, राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीच्या जनजाती संघटनेचे अध्यक्ष श्री. रंगनाथ, हिंदु संस्कृतीचे केंद्रीय सदस्य सौ. राधा भंडारी आदी उपस्थित होते. सनातन हिंदु धर्म संस्कृती संघटनेचे श्री. पुष्पराज पुरुष यांनी ही बैठक आयोजित केली होती.
स्वामी बोधानंदजी महाराज यांच्याशी भेट
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी स्वामी बोधानंदजी महाराज यांची भेट घेतली. या वेळी महाराजांनी हिंदु धर्म टिकवण्यासाठी सोळा संस्कारांची आवश्यकता विषद केली. ते म्हणाले, ‘‘हिंदु धर्मात सोळा संस्कार आहेत. उपनयन संस्कार म्हणजे आपल्याकडे असलेले दोन नयन (डोळे) सोडून तिसरे नयन जागृत करण्याची प्रक्रिया आहे; परंतु अलीकडे संस्कारांचे महत्त्व केवळ विवाह आणि अंतिम संस्कार करण्याची अनुमती मिळवण्याचे माध्यम बनून गेले आहे. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्म जाणण्याचा मार्ग ! मोक्षप्राप्ती या ध्येयाची सतत जाणीव ठेवून कार्य केले पाहिजे.’’