-
ह्यूस्टन (अमेरिका) येथे ‘हाऊडी मोदी’ हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कार्यक्रम
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ५० सहस्र अनिवासी भारतीय यांची उपस्थिती
ह्यूस्टन (अमेरिका) : आतंकवादाच्या विरोधात आणि आतंकवादाला खतपाणी घालणार्यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आतंकवादाच्या विरोधात उभे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ सप्टेंबरला येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हाऊडी मोदी’ (येथील स्थानिक भाषेत ‘हाऊ डू य डू ?’ (तुम्ही कसे आहात ?) याला ‘हाऊडी’ म्हणतात.) या कार्यक्रमात ५० सहस्रांहून अधिक अनिवासी भारतियांसमोर केले. या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तसेच त्यांच्या सरकारमधील काही मंत्री आणि खासदार उपस्थित होते. प्रथमच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारतीय पंतप्रधान यांनी अमेरिकेमध्ये एखाद्या सभेला एकत्रित संबोधित केले. अभूतपूर्व झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह होता. मोदी यांनी त्यांच्या भाषणानंतर ट्रम्प यांच्यासहित स्टेडियममध्ये एक फेरी मारून नागरिकांना अभिवादन केले. ख्रिस्ती धर्मगुरु पोप यांच्या कार्यक्रमानंतर अमेरिकेत इतक्या मोठ्या लोकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच कार्यक्रम होता. मोदी यांनी त्यांच्या भाषणाच्या प्रारंभी भारतातील काही भाषांमध्ये ‘भारतामध्ये सारे काही चांगले आहे’, असे सांगितले. त्यांनी मराठीतही हे वाक्य म्हटले.
मुख्य कार्यक्रमाच्या आधी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
मी साधारण व्यक्ती आहे !
मोदी म्हणाले की, या मेळाव्याचे ‘हाऊडी मोदी’ हे नाव आहे; पण मी एकटा कोणी नाही. १३० कोटी भारतियांच्या आदेशानुसार काम करणारी मी साधारण व्यक्ती आहे.
यंदा भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१ कोटी जनतेने (यावर्षी भारतात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संख्या ६१ कोटी होती.) ऐतिहासिक कौल दिला. या निवडणुकीने भारतीय लोकशाहीची शक्ती जगभर दाखवून दिली.
आतंकवादाचे समर्थन करणार्यांना सारे जग ओळखून आहे !
मोदी पाकचे नाव न घेता पुढे म्हणाले की, ज्यांना स्वतःचा देश सांभाळता येत नाही, अशा मंडळींनी भारतद्वेषाला केंद्रस्थानी ठेवले. आतंकवादाचे समर्थन करणार्यांना सारे जग ओळखून आहे. ९/११ किंवा २६/११ आक्रमणांचे सूत्रधार कोठे सापडतात ?
कलम ३७० अन्याय्य व्यवस्थेचे प्रतीक होते !
३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरमधील जनता कायम विकासापासून वंचित रहात होती. या राज्यातील नागरिकांना इतर राज्यांप्रमाणे अधिकार नव्हते. गरिबी आणि बेरोजगारी वाढल्यामुळे विभाजनवाद्यांचे फावले होते. या अन्याय्य व्यवस्थेचे प्रतीक असलेल्या कलम ३७० चे उच्चाटन संसदेच्या दोन्ही सभागृहांनी दोन तृतीयांश बहुमताने केले.
भारताचा खरा मित्र व्हाइट हाऊसमध्येच !
अमेरिकेचे कौतुक करतांना मोदी म्हणाले की, भारताचा खरा मित्र जगात कोणी असेल, तर तो व्हाइट हाऊसमध्येच आहे. भारत आणि अमेरिका हे मैत्रीचे खरेखुरे प्रतीक आहे. आज आपल्यासमवेत एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यांची ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. पृथ्वीवर सर्वच जण त्यांना ओळखतात, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहेत. त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करावी तेवढी अल्पच आहेे. अमेरिकेला महान बनवणे, अमेरिकेची अर्थव्यवस्था सशक्त करणे, हेच ट्रम्प यांचे ध्येय असून अमेरिकेने जगाला पुष्कळ काही दिले आहे.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनिवासी भारतीय म्हणजे कुटुंबीयच असल्याचे मोदी यांचे मत !
मोदी म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी ‘अब की बार ट्रम्प सरकार’, असा नारा दिला होता’, अशी आठवण करून दिली. ते ट्रम्प यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही मला तुमच्या कुटुंबियांशी भेट घालून दिली होती. आज मी तुम्हाला ह्यूस्टनमधील माझ्या भारतीय कुटुंबियांची भेट करून देत आहे.
पाकिस्तान समर्थकांकडून कार्यक्रमस्थळी आंदोलन करण्याचा अयशस्वी प्रयत्न !
या कार्यक्रमाच्या ठिकाणी पाकिस्तान समर्थकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पाकिस्तानचे काही मंत्रीही या आंदोलनात सहभागी झाले होते. मोदी यांच्या या कार्यक्रमाआधीच सामाजिक माध्यमांतून खलिस्तानवादी आणि मुसलमान यांच्याद्वारे विरोध करण्याचा पाकने प्रयत्न केला होता; मात्र तो पूर्णपणे फसला.
भारत आणि अमेरिका मिळून इस्लामी आतंकवादाचा सामना करणार ! – डोनाल्ड ट्रम्प
भारत आणि अमेरिका यांच्यात नव्या संरक्षण करारावर लवकरच निर्णय होईल. भारत आणि अमेरिका इस्लामी आतंकवादाचा सामना करण्यास सज्ज आहेत, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वेळी केले.
ट्रम्प म्हणाले की, भारत हा अमेरिकेचा सर्वांत विश्वासू मित्र आहे आणि भारतालाही अमेरिकेत माझ्यासारखा चांगला राष्ट्राध्यक्ष मिळाला नसेल. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सशक्त होत आहे. मोदी सरकारने भारतातील ३० कोटी लोकांना दारिद्य्ररेषेच्या बाहेर काढण्याची महत्त्वाची कामगिरी केली आहे. एक सशक्त देश म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. मोदी यांच्या सन्मानार्थ आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. यासाठी मी आभारी आहे. मोदी यांच्यासमवेत मला या मंचावर उपस्थित रहाण्याची संधी मिळाली, हेसुद्धा माझे भाग्य आहे. आपल्या सर्वांचे स्वप्न एकच आहे आणि अनिवासी भारतियांवर आम्हाला गर्व आहे. ६१ कोटी मतदार ही पुष्कळ मोठी संख्या आहे. या जनतेने मोदी यांच्या कर्तृत्वावर विश्वास टाकला. अमेरिकेतील भारतियांनी या देशाला समृद्ध केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले ५० सहस्र नागरिक या समृद्धीचे आणि भारत-अमेरिका मैत्रीचे प्रतीक आहे. भारताची ऊर्जेची आवश्यकता भागवण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे.
मुंबई भेटीवर येऊ का ? – ट्रम्प
पुढच्या वर्षी मुंबईत बास्केटबॉल स्पर्धा होणार आहे. त्यासाठी सहस्रो लोक मुंबईत येणार आहेत. मोदीजी, मी हा खेळ पाहण्यासाठी मुंबईत येऊ का? तुम्ही बोलावले, तर मी येऊ शकतो, असेही ट्रम्प या वेळी म्हणाले.
मोदी यांच्याकडून भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या नियमाचे उल्लंघन ! – काँग्रेस
नवी देहली : माननीय पंतप्रधान, तुम्ही इतर देशांच्या स्थानिक निवडणुकीत हस्तक्षेप न करण्याच्या भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. भारताच्या दीर्घकालीन कूटनीतीच्या हितांसाठी हा पुष्कळ मोठा धक्का आहे. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान या नात्याने अमेरिकेत गेले होते, अमेरिकेतील निवडणुकांचे ‘स्टार’ प्रचारक म्हणून नाही. तुम्ही उघडपणे ट्रम्प यांच्यासाठी प्रचार करणे भारत आणि अमेरिका यांसारख्या सार्वभौम राष्ट्र आणि लोकशाही यांमध्ये फूट पाडणारे आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते आनंद शर्मा यांनी ट्वीट करून पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.
मोदी यांनी ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात ‘ट्रम्प यांनी त्यांच्या मागील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘अब की बार ट्रम्प सरकार’ असा नारा दिला होता’, याची आठवण करून दिली होती. अमेरिकेत पुढील वर्षी म्हणजे २०२० मध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ट्रम्प यांचा अनिवासी भारतियांसमोर प्रचार केला, असा आरोप शर्मा यांनी केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात