नंदुरबार : सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून ‘आदर्श पद्धतीने उत्सव साजरा करावा’, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आले. या वेळी पोलीस अधीक्षक पंडित यांनी ‘नवरात्रोत्सवात आणि खोडाईमाता मंदिर परिसरातील यात्रेत अपप्रकार करणार्यांवर कठोर कारवाई करू’, असे आश्वासन दिले. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. सतीश बागुल, श्री. आकाश गावीत, श्री. मयूर चौधरी आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. या उत्सवाच्या काळात अनैतिक कृत्यांमध्ये वाढ झाल्याची अनेक वृत्ते वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली आहे. यामुळे समाज राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी होत आहे. यातच देशविघातक शक्ती आणि दंगलखोर व्यक्ती, आतंकवादी कारवाया यांचा धोका कायम आहे. गर्दीच्या ठिकाणी अनोळखी किंवा धर्मांध व्यक्ती कार्यक्रमात घुसून उत्सवात तणाव निर्माण करण्याची शक्यताही असते. यासाठी दांडीया आणि नवरात्रोत्सव समारंभाच्या ठिकाणी ओळखपत्र पडताळूनच प्रवेश देण्याची व्यवस्था करावी.