मुंबई : देशात आणि जगभरात हिंदु, हिंदु धर्म आणि देवता यांवर होणार्या आघातांमुळे ईश्वरी राज्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ईश्वरी राज्याची संकल्पना ही नैसर्गिक असून तो हिंदूंचा घटनात्मक अधिकारच आहे. विश्वकल्याणकारी अशा ईश्वरी राज्यासाठी आम्ही नित्य कार्यरत राहू, असा निर्धार कांदिवली येथे २१ आणि २२ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत उपस्थित राष्ट्रप्रेमींनी केला.
या वेळी ‘हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना’, ‘सुराज्य अभियान’, ‘हिंदु राष्ट्रासाठी प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर’ आणि ‘स्वभावदोष निर्मूलनाद्वारे वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात होणारे लाभ’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री. आशिष घनघाव यांनी आणि प्रस्तावना हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी केली.
सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ‘साधना आणि स्वभावदोष निर्मूलन’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘हिंदु राष्ट्राची संकल्पना आणि आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी मार्गदर्शन केले.
‘सुराज्य अभियानांतर्गत समाजात होत असलेले अपप्रकार, अन्नातील भेसळ, भ्रष्टाचार आणि राष्ट्रावरील आघात या विरोधात करावयाचे कार्य’ यासंदर्भात समितीचे श्री. वसंत सणस यांनी मार्गदर्शन केले.
अभिप्राय
१. सौ. पूजा बडेकर आणि श्री. दिनेश बडेकर, सांताक्रूझ – आम्ही नामजपाची शक्ती अनुभवली आहे. कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात नामस्मरणामुळे सकारात्मक अनुभव आले.
२. डॉ. सुजित यादव, विरार – स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवून प्रत्येकाने तिचा लाभ करून घ्यायला हवा. समविचारी लोकांना भेटून पुष्कळ आनंद झाला.
३. श्री. विनोद पागधरे, माहीम – शिबिरात शिकायला मिळालेली माहिती अमूल्य आहे. बाहेर कितीही पैसे देऊन असे ज्ञान मिळणार नाही.
४. श्री. नितेश पाल, दहिसर – ‘सेक्युलॅरिझम’चे दुष्परिणाम आणि ईश्वरी राज्याची आवश्यकता लक्षात आली.
५. श्री. सज्जन सरोज, गोरेगाव – शिबिरात जीवन जगण्याची कला शिकायला मिळाली.