गोव्यातील ‘इन्क्विझिशन’चे अत्याचार, चर्चमधील लैंगिक छळ, बायबलमधील अवैज्ञानिक सिद्धान्त यांविषयी पादरी दिब्रिटो भूमिका स्पष्ट करतील का ? – हिंदु जनजागृती समिती
मराठी भाषा संवर्धनासाठी साहित्य संमेलने भरवली जातात. या संमेलनांतून मराठी भाषेचे किती भले झाले, हा एक वेगळाच प्रश्न आहे; मात्र आता या संमेलनांचे व्यासपीठच ख्रिस्ती धर्माच्या प्रचाराचे आजीवन व्रत स्वीकारलेल्या पाद्य्रांच्या हाती सोपवले जाणार आहे ! यात केवळ धर्म वेगळा असण्याचा मुळीच प्रश्न नाही, याचे कारण म्हणजे संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. यु.म. पठाण यांना धर्म आड न आणता महाराष्ट्रातील जनतेने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून स्वीकारले आहे; मात्र कॅथॉलिक पंथाचे पाद्री फ्रान्सिस दिब्रिटो यांनी साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषेची सेवा केलेली आहे कि ख्रिस्ती साहित्य मराठीत उपलब्ध करून धर्मांतरणास साहाय्य केले आहे, हा विचार करण्यायोग्य मुद्दा आहे. याचवेळी लक्षात घेतले पाहिजे की, राष्ट्रसेवेच्या दृष्टीने साहित्याची रचना करणार्या हिंदुत्वनिष्ठ साहित्यिकांना मात्र अस्पृश्यत्वाची वागणूक देण्यात आली आहे. वर्ष 1977 मध्ये भाषाप्रभु पु.भा. भावे यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिल्यावर ते संमेलन उधळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर प्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना संमेलनाच्या निवडणुकीस उभे रहाण्यासच विरोध करण्यात आला. याचा अर्थ पुरोगामी महाराष्ट्रात कॅथॉलिक पंथाचे पायघोळ झगे घालून विचार मांडणारे धर्मप्रचारक पाद्री चालतील; मात्र भगव्याची सेवा करणारे हिंदुत्वनिष्ठ विचारवंत चालणार नाहीत, असा घ्यावा का ?, असा परखड प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी विचारला आहे.
ठाण्यातील संमेलन केवळ दादोजी कोंडदेव नामक प्रेक्षागृहात झाले म्हणून विरोध करण्यात आला, तर 2013 मध्ये झालेल्या चिपळूण येथील संमेलनात भगवान परशुरामाची प्रतिमा व्यासपीठावर लावण्यावरून संमेलन उधळण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. पुरोगामीपणाचा दंभ मिरवणारी ही मंडळी आता मात्र गप्प बसली आहेत !
पाद्री फ्रान्सिस दिब्रिटो यांनी साहित्यातून ख्रिस्ती धर्माचीच सेवा केली आहे. त्यांनी ख्रिस्त्यांच्या अंधश्रद्धा, ख्रिस्ती धर्मगुरूंकडून होणारे लैंगिक शोषण, सक्तीने केले जाणारे धर्मांतर, ‘विच हंट’च्या नावे चेटकिणी ठरवून सहस्रो ख्रिस्ती महिलांना जिवंत जाळणार्या चर्चची विकृती यांवर अवाक्षरही काढलेले नाही. उलट केशरी चाफा आणि पांढरा चाफा या रूपकाच्या माध्यमातून ‘ख्रिस्ती धर्म कसा सहिष्णू आणि हिंदुत्व कसे आक्रमक’ यांचे डोस दिले आहेत. गोव्यातील इन्क्विझिशनचे अत्याचार तसेच आयर्लंडमधील बायबलआधारित कायद्यांमुळे गर्भपाताला नकार दिल्याने डॉ. सविता हालप्पणवार यांचा आणि त्यांच्या पोटातील बाळाचा रुग्णालयात झालेला मृत्यू यांविषयी पादरी दिब्रिटो क्षमा मागतील का ? उद्या आतंकवादाचे समर्थक झाकीर नाईक यांनी मराठीत कुराण आणि अन्य साहित्य लिखाणाची सेवा केल्यास त्यांनाही संमेलनाचे अध्यक्षपद मिळण्यास पुरोगाम्यांची हरकत नसावी, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.