अयोध्या, वाराणसी आणि धनबाद येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
बिहारमधील समस्तीपूर, मुझफ्फरपूर आणि वैशाली येथेही शासनाला निवेदन
अयोध्या (उत्तरप्रदेश) : केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी, देहली विश्वविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या अक्षय लाकडा याला अटक करावी, तसेच पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या सुरक्षेच्या नावाखाली तेथील प्राचीन मठ आणि मंदिरे यांना अवैध ठरवून ती पाडण्याची कारवाई राज्य सरकारने थांबवावी, या मागण्यांसाठी उत्तरप्रदेशमधील अयोध्या येथील तिकोनिया पार्क, वाराणसी येथील शास्त्री घाट, वरुणा पूल आणि झारखंडमधील धनबाद येथील रणधीर वर्मा चौक या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आदोलनांमध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्माभिमानी यांनी सहभाग घेतला.
अयोध्या येथे हिंदु महासभेचे श्री. विधी पूजन पांडेय, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नंदकिशोर वेद आदींनी संबोधित केले. वाराणसी येथे राष्ट्र्रीय बजरंग दलाचे श्री. कपिल सिंह, हिंदु जागरण मंचचे श्री. रवि प्रताप श्रीवास्तव, विश्व सनातन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल सिंह, विश्व सनातन सेनेचे श्री. प्रदीप श्रीवास्तव, अधिवक्ता मदन मोहन यादव, अधिवक्ता विकास श्रीवास्तव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी आणि श्री. राजन केसरी आदी उपस्थित होते. या वेळी शासकीय अधिकारी सौ. शुभांगी श्रीवास्तव यांना निवेदन देण्यात आले. या समवेतच वरील मागण्यांसाठी बिहारमधील समस्तीपूर, मुझफ्फरपूर आणि वैशाली येथेही शासनाला निवेदन देण्यात आले.
अयोध्या येथील आंदोलनातील क्षणचित्रे
१. हिंदु राष्ट्र कार्यशाळेत सहभागी झालेले डॉ. अरविंद सिंह यांनी आंदोलनासाठी उत्स्फूर्तपणे सेवा केली.
२. आंदोलनाच्या हस्तफलकांसाठी लागणार्या प्रिंटची व्यवस्था धर्मप्रेमी श्री. रवींद्र श्रीवास्तव यांनी केली.
३. हिंदुत्वनिष्ठ वैद्य रामप्रकाश पांडेय यांनी आंदोलनाला लागणारी अनुमती घेण्याची सेवा केली, आंदोलनाचा प्रसार केला, तसेच आंदोलनस्थळी स्वाक्षरी घेण्याची सेवा केली.