जिल्हाधिकार्यांना निवेदन
कोल्हापूर : २८ मार्च २०१६ या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या श्री महालक्ष्मी मंदिर सुरक्षितता आढावा बैठकीत श्री महालक्ष्मी मंदिराची संरक्षक भिंत आणखी तीन फुटांनी उंच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयाला बजरंग दलाचा तीव्र विरोध आहे, असे निवेदन बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे. (महिला कैद्यांकडून लाडूचा प्रसाद करून घेणे असो वा अन्य काही, जिल्हाधिकारी प्रतिदिन मंदिराच्या संदर्भात नवनवीन निर्णय घेत आहेत; मात्र मनकर्णिका कुंडावरील अतिक्रमण, तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील भ्रष्टाचार यांवर एक अवाक्षरही काढत नाहीत, असे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की….
१. तीन फुटांनी भिंत वाढवल्याने मंदिर खरोखर सुरक्षित रहाणार आहे का, याची खात्री काय ? यापूर्वी मंदिर सुरक्षेचा उडालेला फज्जा अनेकांनी पाहिला आहे.
२. बेळगावमधील खाजगी सैनिक शाळेने केलेला प्रवेश असो वा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचार सभेच्या वेळी मंदिरातील मेटल डिटेक्टर उचलून घेऊन सभेच्या ठिकाणी लावण्याचा प्रकार असो, अशा गंभीर प्रकारांत आतापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही.
३. त्यामुळे यामागचा हेतू नेमका काय आहे ? हा प्रकार म्हणजे हिंदु मंदिर प्रशासकीय पातळीवर झाकून ठेवून भक्तांना न दिसण्यासाठीचा हा प्रयत्न आहे का ?
४. मंदिराची सुरक्षा करायची होती, तर तीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी मंदिर सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या १९ सूत्रांपैकी किती सूत्रांवर पुढील कार्यवाही झाली ?
५. जिल्हाधिकार्यांच्या निर्णयामुळे मूळ मंदिराच्या प्राचीन सौंदर्याला बाधा येणार आहे, तसेच मूळ वास्तूला धक्का लागणार आहे. त्यामुळे मंदिराची भिंतीची उंची वाढवण्यापेक्षा राज्य राखील पोलीस दलाचा बंदोबस्त कायमस्वरूपी मिळवण्याचा प्रयत्न व्हावा.
सदरच्या निवेदनावर जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे, शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, सर्वश्री प्रमोद सावंत, प्रसाद जाधव, सुधाकर सुतार, बाबा महाडिक, सागर कलघटगी, सचिन म्हांगुरे, प्रशांत कागले, तसेच अन्य हिंदु धर्माभिमान्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात